Raj Thackeray vs Pakistan : पाकिस्तानी अभिनेत्याच्या चित्रपटाला मनसेचा विरोध, राज ठाकरेंचा इशारा
मुंबई : पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या चित्रपटाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विरोध करण्यात येत आहे. फवादचा 'लिजेंड ऑफ मौला जट' चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सोशल मीडियावर चित्रपटाचा विरोध केला आहे आणि ट्वीट करुन इशारा दिला आहे. राज ठाकरेंनी ट्वीटमध्ये म्हटलंय, कलेला सीमा नसतात, पण पाकच्या बाबतीत हे अमान्य आहे.
पाकिस्तानी अभिनेत्याच्या चित्रपटाला मनसेचा विरोध
इतर राज्यांच्या सरकारांनीही हा चित्रपट प्रदर्शित होऊ देऊ नये, असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. या चित्रपटावरुन राज ठाकरेंनी चित्रपटगृहाच्या मालकांनीही इशारा दिला आहे. थिएटर मालकांनीही चित्रपट दाखवयाच्या भानगडीत पडू नये, असं राज ठाकरेंनी म्हटलंय. नवरात्रीदरम्यान मला कुठलाही संघर्ष नको, सरकारनं चित्रपट प्रदर्शित होणार नाही ते पाहावं, असंही त्यांनी म्हटलं आहे.
राज ठाकरे यांनी ट्वीटमध्ये नेमकं काय लिहिलंय?
फवाद खान नावाच्या पाकिस्तानी अभिनेत्याचा, 'लिजेंड ऑफ मौला जट' नावाचा सिनेमा लवकरच भारतात प्रदर्शित होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा सिनेमा कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही. पाकिस्तानी कलाकारांचे सिनेमे मुळात भारतात प्रदर्शित का होऊ दिले जातात?