Majha Maharashtra Majha Vision | ...म्हणून शाळा सुरु करण्याचाही निर्णय घेण्यात आला : वर्षा गायकवाड
'कोरोना काळात शिक्षण क्षेत्रासमोर अनेक मोठी आव्हानं आली. कोरोना काळात एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली की, शैक्षणिक क्षेत्रात तंत्रज्ञानाचा विकास होणं गरजेचं आहे. त्यामुळे भविष्यात महाराष्ट्रात तंत्रज्ञानाचं एक फोरम निर्माण केलं पाहिजे'; असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. तसेच दहावी-बारावीच्या परीक्षा साधारणतः एप्रिल किंवा मे महिन्या दरम्यान घेण्याचा विचार सुरु असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्या एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' या कार्यक्रमात बोलत होत्या.
'कोरोनामुळे शिक्षण व्यवस्था कशी सुरु करायची हा प्रश्न केवळ राज्यचं नाहीतर, संपूर्ण जगासमोर होता. त्यानंतर विविध माध्यमांतून शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु झाला. ऑनलाई, ऑफलाईन, एवढंच नाहीतर प्रत्येक जिल्ह्यांत जाऊन शिक्षकांनी विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही लोकांकडे मोबाईल नाही ही बाब लक्षात आल्यानंतर टेलिव्हिजन आणि काही दिवसांतच गूगलचा पर्याय निवडण्यात आला. एवढंच नाहीतर मुलांपर्यंत अभ्यासक्रम पोहोचवण्यासाठी व्हॉट्सअॅपचाही मार्ग वापरण्यात आला.'; कोरोना काळात शिक्षण खात्याने केलेल्या कामांबद्दल बोलताना शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली.
वर्षा गायकवाड यांनी बोलताना सांगितले की, 'कालांतराने विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शाळा सुरु करण्याचाही निर्णय घेण्यात आला. त्याअनुषंगाने नियमावली तयार करण्यात आली. त्यामध्ये निर्जंतुकीकरण, स्वच्छता आणि इतर सोयीसुविधांसह शिक्षकांच्या आरटीपीसीआर टेस्टही करण्यात आल्या. यानुसार, जवळपास 25 जिल्ह्यांमध्ये 9 हजार 127 शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. तर त्या शाळांमध्ये 3 लाख विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली आहे.'
#MarathiNews #ABPMajha #ABPMajhaLiveNews