(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Bandh : आज ‘महाराष्ट्र बंद’, महाराष्ट्रात बंदला कसा प्रतिसाद मिळाला?
मुंबई : लखीमपूर हिंसाचाराच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदचं आवाहन केलं आहे. या बंदला राज्यभरातून संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळालं. काही ठिकाणी बाजारपेठा कडकडीत बंद आहेत तर काही ठिकाणी बाजारपेठा सुरु आहेत. महाविकास आघाडी सरकारनं पुकारलेल्या महाराष्ट्र बंदवर विरोधकांकडून आक्षेप घेण्यात आला आहे. आजचा बंद हा सरकार पुरस्कृत दहशतवाद असल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. त्याचबरोबर पोलीस दलाचा वापर करत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीकडून जबरदस्तीनं व्यापाऱ्यांना दुकानं बंद करण्यासाठी भाग पाडलं जातंय, असाही आरोप भाजप नेत्यांनी केला आहे.
लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ आणि राज्यपालांना निवेदन देण्यासाठी राजभवनावर काँग्रेस नेत्यांकडून मौन व्रत आंदोलन करण्यात आलं. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, भाई जगताप, यशोमती ठाकूर यांच्यासह काँग्रेस नेते उपस्थित होते. शेतकऱ्यांना चिरडून मारणाऱ्या भाजपला आजच्या बंद बद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, असं प्रत्युत्तर काँग्रेस नेत्यांनी दिलंय.
महाराष्ट्र बंद पुकारण्यात आल्यानंतर मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलं. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक आंदोलनात सहभागी झाले होते. त्यावेळी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. महाराष्ट्र बंद पुकारण्यात आल्यानंतर मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलं. मुंबईत खासदार सुप्रिया सुळे या महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी झाल्या होत्या. राष्ट्रवादीकडून हुतात्मा चौकात आंदोलन करण्यात आलं. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रवक्ते नवाब मलिक हे देखील सहभागी झाले होते.