Laxman Hake : मराठ्यांसह ओबीसी नेतेही आक्रमक, जरांगेंच्या आंतरवालीत हाकेंचं उपोषण ABP Majha
सोलापूर: गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गातंर्गत शिक्षण आणि नोकरीत 10 टक्के आरक्षण दिले आहे. मात्र, मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठा समाजाला ओबीसी (OBC Resrvation) प्रवर्गातून आरक्षण मिळावे, ही मागणी लावून धरली आहे. तसेच कुणबी नोंदी (Kunbi Maratha) असलेल्या मराठा बांधवांना सगेसोयऱ्यांच्या व्याखेत बसणारे आरक्षणही लागू व्हावे, असे मनोज जरांगे यांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्यातील ओबीसी समाजही आक्रमक होण्याची शक्यता आहे. ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनीही आता आंतरवाली सराटीत प्राणांतिक उपोषण करण्याची घोषणा केली आहे. लक्ष्मण हाके यांनी सोशल मीडियावर एक व्हीडिओ शेअर करुन आपली भूमिका मांडली आहे.
ओबीसी समाजाच्या आरक्षणात नवे वाटेकरी निर्माण होऊ नयेत, ओबीसी समाजाला असलेल्या आरक्षणाचे रक्षण व्हावे, यासाठी आपण उपोषणाला बसणार असल्याचे लक्ष्मण हाके यांनी सांगितले. मात्र, लक्ष्मण हाके हेदेखील आंतरवाली सराटीतच उपोषणाला बसल्यास राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता राज्य सरकार आणि पोलिसांकडून लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाबाबत काय भूमिका घेतली जाणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.