Kedar Dighe on Dharmaveer 2 : दिघेंना संपवण्यात आलं?शिरसाटांच्या दाव्यावर केदार दिघे काय म्हणाले?
मुंबई : दिवंगत शिवसेना नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गुरुस्थानी असलेल्या आनंद दिघे यांच्या जीवनपटाचा भाग 2 म्हणजेच धर्मवीर 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट हा बहुचर्चित सिनेमा शुक्रवारी 27 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला. अपेक्षेप्रमाणे शिवसेना शिंदे गटाकडून या चित्रपटाचे स्क्रिनींग अनेक ठिकाणी मोफत करण्यात आले. तर, शिंदेंच्या शिवसैनिकांनी चित्रपटावर चर्चाही सुरू केली आहे. मात्र, ऐन विधानसभा निवडणुकांच्या (Election) तोंडावर हा चित्रपट प्रदर्शित करत शिंदेंच्या शिवसेनेकडून राजकीय नेरेटीव्ह पसरवला जात असल्याचा आरोप केला जातोय. तर, आनंद दिंघेंना बाळासाहेब ठाकरेंपेक्षा मोठं करण्याचा प्रयत्न होतोय, अशी थेट टीका संजय राऊत यांनी केलीय. आता, धर्मवीर 2 सिनेमावरुन शिंदेंचे आमदार संजय शिरसाट आणि आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांच्यात जुंपल्याचं दिसून आलं.
केदार दिघेंकडून सिनेमा न पाहण्याचं आवाहन
धर्मवीर एक असो किंवा धर्मवीर दोन असो हा चित्रपट बनवणारी सगळी मंडळी ही गोंधळलेला अवस्थेत असलेले दिसतात. स्वतःची प्रतिमा कशी सांभाळावी आणि आपण केलेली गद्दारी हे आपण लोकांसमोर चांगल्या पद्धतीने मांडून आपली प्रतिमा सांभाळण्याचं काम किंवा हा केविलवाणा प्रयत्न करतानाही मंडळी दिसतात. उद्धव साहेबांची नेमणूक किंवा त्या काळात बाळासाहेब असताना बाळासाहेबांनी केलेली ही नेमणूक होती, आणि त्याच्यावरती हा प्रश्न विचारला जातोय हा माझा थेट आरोप आहे, असे म्हणत केदार दिघे यांनी सिनेमावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. बाळासाहेबांनी घेतलेला हा निर्णय तुम्हाला चुकीचा वाटतंय का आणि जर चुकीचा वाटत असेल म्हणून तुम्ही दिघे साहेबांच्या आडोशाला जाऊन दिघे साहेबांना पुढे करून तुम्ही हा प्रश्न विचारत आहे का, असा सवालही राजन विचारे यांनी केला आहे. बाळासाहेबांनी घेतलेला कोणताही निर्णय असो, तो बरोबर की चुकीचा हा विषयच कधी आला नाही. बाळासाहेबांनी घेतलेल्या प्रत्येक निर्णयाची अंमलबजावणी झाली पाहिजे असे प्रत्येक शिवसैनिकाला वाटत होते आणि आजही वाटते
लोकांनी हा धर्मवीर चित्रपट पाहूच नये, यामागचं कारण असं आहे की, दिघे साहेबांचं आयुष्य हे खूप वेगळं होतं. दिघे साहेबांचा संबंध आज सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा होता, त्यांनी जो दाखवलेला आहे, तो स्वतःवरती केंद्रित असा दाखवलेला आहे. दिघे साहेब थोडा वेळ आणि बाकी पूर्ण वेळ तुमची इमेज बिल्डिंग करण्याचा जो प्रयत्न करताय हे लोकं समजू शकत नाहीत किंवा लोकं एवढे मूर्ख आहेत, असं कोणीही समजू नये. लोकांना तुम्ही केलेली गद्दारी हे व्यवस्थित लक्षात आहे, निवडणूक आले की दिघे साहेबांच्या नावाचं भांडवल करण्याचा काम अनेक लोक करतात.