Kalyan Railway Update : कल्याण स्टेशन जवळ सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वे विस्कळीत
कल्याण स्टेशन जवळ सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वे विस्कळीत झालीये.. कल्याण जवळ लोकल थांबवण्यात आल्या आहेत... त्याचप्रमाणे मुंबई आणि कर्जत कसाराकडे जाणाऱ्या लोकल उशिराने धावत आहेत..
मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उपनगरीय रेल्वे सेवेवरही पावसाचा परिणाम झाला आहे. मध्य रेल्वे मार्गावरील लोकल ट्रेन 15 ते 20 मिनिटांच्या विलंबाने धावत आहेत. तर पश्चिम रेल्वेमार्गावरील लोकल ट्रेन 5 ते 10 मिनिटे आणि हार्बर रेल्वेच्या लोकल ट्रेन तब्बल 15 मिनिटं उशीराने धावत आहेत. त्यामुळे रेल्वे सेवेवर अवलंबून असलेल्या चाकरमान्यांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. अद्याप मुंबईत सखल भागात कुठेही पावसाचं पाणी साचले नाही . पाऊस असल्याने रस्ते वाहतूक नेहमीप्रमाणे संथगतीने आहे. येत्या काही तासांमध्ये पावसाचा जोर कायम राहिल्यास पूर्व द्रुतगती महामार्ग आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावण्याची शक्यता आहे.
कल्याण-डोंबिवलीतही मुसळधार पाऊस
कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या परिसरामध्ये मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. अनेक रस्त्यांना तळ्याचे स्वरुप आले आहे. त्यामुळे सकाळी घराबाहेर पडलेल्या शाळकरी विद्यार्थ्यांसह चाकरमान्यांचे हाल होताना दिसत आहेत.
कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात गुडघाभर पाणी साचले आहे. गुरुदेव हॉटेल ते शिवाजी महाराज चौकापर्यंत मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक कोंडी होताना दिसत आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा रस्ताही जलमय झाला आहे.