BJP on Jitendra Awhad : पार्सल पाकिस्तानला पाठवू...आव्हाड यांच्याविरोधात भाजप आक्रमक
मुंबई : मनुस्मृतीच्या श्लोकांचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्याला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awhad) विरोध केला. त्याविरोधात बुधवारी महाडमधील चवदार तळं इथं आव्हाडांनी आंदोलन केलं. या आंदोलनादरम्यान जितेंद्र आव्हाडांच्या हातून एक मोठी चूक घडली आणि हे आंदोलन आता आव्हाडांच्या अंगलट आल्याचं दिसतंय. जितेंद्र आव्हाडांच्या हातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा असलेला कागद फाडला गेला आणि त्यावरून आता राज्याचं राजकारण तापल्याचं दिसतंय.
मनुस्मृतीच्या प्रती जाळण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाडमधलं ऐतिहासिक तळं गाठलं. मनुस्मृतीच्या श्लोकांचा शालेय अभ्यासक्रमात समावेश नको म्हणून त्यांनी हा आक्रमक पवित्रा घेतला. मात्र या आंदोलनादरम्यान जितेंद्र आव्हाडांच्या हातून एक मोठी चूक घडली. त्यांच्या हातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला गेला. आव्हाडांच्या हातून घडलेल्या या कृत्याविरोधात नाशिक, मुंबई, ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेने आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आंदोलन केलं.
वंचितचा निषेध
झाल्या प्रकाराबद्दल जितेंद्र आव्हाडांनी माफी मागितली खरं, पण यावरून सुरू झालेलं राजकारण आता थांबण्याचं नाव घेत नाही. भाजपनं जितेंद्र आव्हाडांविरोधात जोरदार टीका करत गुरूवारी राज्यभर आंदोलनाचा इशारा दिला. तर वंचितनेही त्यावर प्रतिक्रिया दिली.























