(Source: ECI/ABP News/ABP Majha)
BIG BOSS Shivleela Patil : बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर कीर्तनकार शिवलीला पाटील पहिल्यांदाच ‘माझा’वर
पंढरपूर : 'बिग बॉस'मध्ये जाण्यामुळे वारकरी संप्रदाय दुखावला असेल तर मी माफी मागते मात्र तेथे जाण्याचा माझा मार्ग चुकला असला तरी हेतू प्रामाणिक होता. यापुढे मात्र ज्येष्ठांचा सल्ला घेतल्याशिवाय असा निर्णय घेणार नाही. बिग बॉस मधून बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदाच कीर्तनकार शिवलिला पाटील यांनी ABP माझा समोर केले मन मोकळे
मी 'बिग बॉस सिझन 3' मध्ये जाण्याच्या घेतलेल्या निर्णयाने वारकरी संप्रदाय आणि ज्येष्ठ मंडळी नाराज झाल्याने मी त्यांना दोन हस्तक आणि एक मस्तक टेकवून माफी मागते. माझे विचार पोहचवण्यासाठी मी निवडलेला मार्ग चुकीचा असला तरी माझा हेतू मात्र प्रामाणिक होता अशी भूमिका कीर्तनकार शिवलिला पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केली. अत्यंत लहान वयात राज्यभर महिला कीर्तनकार म्हणून प्रसिद्धीस आलेल्या शिवलीला पाटील या बिग बॉसमध्ये गेल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठत होती . सोशल मीडियात नेटकऱ्यानी त्यांना चांगलेच ट्रोल केल्याने शिवलीला काय भूमिका मांडते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते . विठ्ठल दर्शनाला आल्यानंतर त्यांनी ABP माझा सोबत बोलताना आपले मन मोकळे केले .
महाराष्ट्राची संस्कृती , वारकरी संप्रदाय , कीर्तन परंपरा याबाबत हा शो पाहणाऱ्या मराठी आणि अमराठी वर्गाचे प्रबोधन करावे याच हेतूने मी बिग बॉस च्या तिसऱ्या सीझनमध्ये दाखल झाले. यानंतर मात्र मी पैसे आणि प्रसिद्धीसाठी गेल्याचे आरोप सुरु झाले मात्र आपल्याला त्याची गरज नसल्याचे शिवलीलाने सांगितले. आपली संस्कृती या फिल्मी प्रेक्षकांपर्यंत पर्यंत पोचवणे याच हेतूने मी तेथे जाण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. मला मात्र यामुळे खूप मोठ्या प्रमाणात ट्रोल केले गेले. डोक्यावर पदर नाही म्हणून सांगितले गेले मात्र मी तेथेही जे कीर्तनाच्या व्यासपीठावर करते तेच तेथे केल्याचे तिने सांगितले.मी गाण्यावर नाचल्याबाबत आक्षेप घेतले गेले मात्र मी नाचले ते पहिले गाणे विठुरायाच्या वारीचे होते तर दुसरे गाणे आई तुळजाभवानीचे होते. मात्र यानंतर इतर कोणत्याही हिंदी गाण्यावर ना माझे हात हलले ना पाय अशा शब्दात तिने सफाई दिली.
बिग बॉस हा शो वारकरी संप्रदाय पाहत नाही हे मलाही माहित आहे. मात्र ज्या प्रेक्षकांना वारकरी परंपरा माहित नव्हत्या त्यांना त्या माहिती करून दिल्या. मी तिथे गेल्यानंतर तुळशी वृंदावनाच्या रोज सर्व मंडळी पाय पडू लागले तेथे 'बोला पुंडलिक वरदाचा नाद घुमू लागला' हेच माझे यश असल्याचे सांगताना तेथील विकृतीची प्रकृती बदलून दाखविल्याचे शिवलीला सांगते. मी कोणत्याही व्यासपीठावर गेले तरी माझ्या तोंडी विठुरायाचे नाव आणि मनात छत्रपतींचे विचार कधीच मिटणार नाहीत अशा शब्दात शिवलीला पाटील यांनी टीकाकारांना उत्तर दिले.
तृप्ती देसाई यांच्या सोबतच वादावर बोलताना मी मर्यादा पाळत त्यांना योग्य शब्दात योग्य पद्धतीने चोख उत्तर दिल्याचे सांगताना इंदोरीकर महाराजांच्या भूमिकेच्या मागे असल्याचे त्यांनी सांगितले. बिग बॉसमध्ये जाण्याच्या निर्णयाला घरच्यांनीही विरोध केला होता. मात्र त्यांनाही आपला हेतू सांगितल्यावर त्यांनी परवानगी दिली असल्याचे शिवलीलाने सांगितले .
मी पश्चिम महाराष्ट्रातील असल्याने तेथील दमट हवामान आणि वातानुकूलित यंत्रणेच्या गारव्याने माझी तब्येत बिघडली . मी चार दिवस हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होते . यानंतर मी शांतपणे विचार करून केवळ तब्येतीच्या कारणाने बिग बॉस च्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे शिवलीलाने सांगितले. मात्र माझ्या जाण्याने जे वाद उठले , ज्या पद्धतीने सांप्रदायातील जेष्ठ मंडळी नाराज झाली त्यामुळे आता यापुढे दूध पोळल्यामुळे भविष्यात असा कोणतीही चूक करणार नाही. असा कोणताही निर्णय घ्यायची वेळ आली तर वारकरी संप्रदायातील ज्येष्ठांचा सल्ला घेतल्याशिवाय पुढे जाणार नसल्याचे शिवलीला पाटील यांनी सांगितले .