Beed Crime Update : काठ्या-लाठ्या अन् पाईप...बीडमध्ये महिला वकिलाला सरपंचाकडून मारहाण
Beed Crime Update : काठ्या-लाठ्या अन् पाईप...बीडमध्ये महिला वकिलाला सरपंचाकडून मारहाण
अंबाजोगाई सत्र न्यायालयात वकिली करणाऱ्या ज्ञानेश्वरी अंजान या तरुणीला गावाचा सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. 14 एप्रिल रोजी ज्ञानेश्वरी अंजान (Gyaneshwari Anjan) हिला मारहाण करण्यात आली होती. सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी पाईपने ज्ञानेश्वरीला प्रचंड मारले. ही मारहाण इतकी भीषण होती की, ज्ञानेश्वरी अंजान यांच्या अंगातील रक्त साकळले असून त्यांच्या पाठीवर काळे-निळे वळ उठले होते. ही घटना उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर 'एबीपी माझा'ने ज्ञानेश्वरी अंजान हिच्याशी संवाद साधून या सगळ्या वादाची पार्श्वभूमी जाणून घेतली. (Beed Crime News)
अंबाजोगाईतील सनगाव येथील ज्ञानेश्वरी अंजान हिला मायग्रेन आणि पाठीच्या दुखण्याचा त्रास असल्याने तिला बोलतानाही प्रचंड त्रास जाणवत होता. तिने सांगितले की,तिने सांगितले की, 23 फेब्रुवारी 2023 रोजी गावातील एका मंदिराच्या भोंग्याचा आवाज तीव्र होता. मी त्यावेळी अभ्यास करत होते. जास्त आवाजामुळे माझं अभ्यासात लक्ष लागत नव्हते. मी त्यावेळी सरपंच अनंत अंजान यांना फोन करुन भोंग्याचा आवाज कमी करायला सांगितला. त्यांनी मी कर्मचाऱ्याला आवाज कमी करायला सांगतो, असे सांगितले. मात्र, दोन तास उलटूनही काही झाले नाही. मी पुन्हा फोन केला तेव्हा कर्मचारी माझा कॉल उचलत नसल्याचे सरपंचांनी सांगितले. त्यामुळे मी संबंधित कर्मचाऱ्याच्या घरी जाऊन देवळातील भोंग्याचा आवाज कमी करायला सांगितले तेव्हा मी नॉनव्हेज खाल्ल्याने मंदिरात जाऊ शकत नाही, असे त्याने म्हटले. त्यामुळे मी पुन्हा सरपंचांना कॉल केला तेव्हा त्यांनी पोलिसांत तक्रार करायला सांगितले. मी तरीही आधी ग्रामविकास अधिकाऱ्याला फोन केला. तो बोलला मी उद्या आल्यावर आवाज कमी करतो. त्यावर मी बोलले की, आवाज सकाळपर्यंत सुरु राहिला तर मी काय करु? मला त्रास होत असल्याने आवाज सहन होत नव्हता. त्यामुळे मी पोलीस ठाण्यात फोन करुन तक्रार केली. पोलिसांनी त्यामध्ये हस्तक्षेप करुन आवाज कमी केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सरपंच त्याच्या लोकांना घेऊन माझ्या घरी आला. माझ्या आई-वडिलांवर दबाव टाकला. तुम्हाला धार्मिक कार्यक्रम करुन द्यायचे आहेत की नाही, असे त्याने विचारले. या प्रकारानंतर सरपंचाने मुद्दाम पिठाच्या तीन गिरण्या आमच्या घराच्या बाजूला सुरु केल्या. या सततच्या आवाजाने मला गंभीर प्रकारचा मायग्रेन झाला. मला पाठदुखीची समस्याही जडली, असा आरोप ज्ञानेश्वरी अंजान यांनी केला.























