(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Majha Maharashtra Majha Vision 2021 : आर्थिक निकषावर आरक्षण देण्यात यावं : Baba Ramdev
आपण जिथून प्रवास सुरु केला, शेती क्षेत्र, उद्योग क्षेत्र, आरोग्य क्षेत्र, संशोधनात आणि समाजजीवनाच्या विविध क्षेत्रात कोणतंही राष्ट्र पुढे जातं, तेव्हा गोष्ट एका तत्वाची नसते, तर समाजजीवनाच्या सर्व तत्वांचा सर्वसमावेशी, सर्वांगीण विकास होतो, असं बाबा रामदेव म्हणाले. तसेच अद्यापही अनेक गोष्टींसाठी आपण चीनवर अवलंबून आहोत. अनेक गोष्टींसाठी युरोपातील कंपन्यांवर निर्भर आहोत. त्यामुळे सर्वच क्षेत्रात आपल्याला आत्मनिर्भर होण्याची गरज आहे, असंही बाबा रामदेव यांनी स्पष्ट केलं. एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' या कार्यक्रमात ते बोलत होते.
धर्मनिरपेक्षता, समानता, सहिष्णूता, सद्भावना आणि एकात्मकेतनं आपण पुढे जाऊ : बाबा रामदेव
"आपण जिथून प्रवास सुरु केला, शेती क्षेत्र, उद्योग क्षेत्र, आरोग्य क्षेत्र, संशोधनात आणि समाजजीवनाच्या विविध क्षेत्रात कोणतंही राष्ट्र पुढे जातं, तेव्हा गोष्ट एका तत्वाची नसते, तर समाजजीवनाच्या सर्व तत्वांचा सर्वसमावेशी, सर्वांगीण विकास होतो. सर्वस्पर्शी विकास होतो. तेव्हा आपण म्हणू शकतो की, आपण आपल्या शहीदांची स्वप्न पूर्ण केली आहेत. तसेच हे पूर्ण करण्यासाठी आपण यशस्वी झालो आहोत. आपण सामाजिक, राजकीय, धार्मिक जीवनात जे आपले मूळ सिंद्धांत आहेत, ते भारतात धर्मनिरपेक्षता, समानता, सहिष्णूता, सद्भावना आणि एकात्मकेतनं आपण पुढे जाऊ. पुढे जाऊन अनेक गोष्टी करायच्या आहेत. या प्रवासाला अंत नाही.", असं योगगुरु रामदेव बाबा म्हणाले.
जातीपात, प्रांत, भाषा, धर्म या भेदभावातून देशाला मुक्त झालेलं पाहायचंय : बाबा रामदेव
बाबा रामदेव म्हणाले की, "मी लहानपणापासूनच या गोष्टीसाठी खूप आग्रही होतो. इंग्रजांनी आपल्या देशाची खूप लूट केली. त्यामुळे माझ्या मनात अद्यापही आक्रोश आहे. वैर नाही, पण माझ्यात एक झंझावात आहे. एक वीरता, पराक्रम, स्वाभिमानाची भाव चेतना आहे. त्यांनी आपल्यावर आक्रमणं केली. आपण राजकीय गुलामगिरीतून मुक्त झालोय, पण आर्थिक, सांस्कृतीक, वैचारिक गुलामगिरीतून भारत कधी मुक्त होणार? हा प्रश्न माझ्या मनात नेहमीच असतो. दुसरा माझ्या मनात भाव असतो की, मी लहानपणापासून पाहिलं होतं की, जातीपातीचा भेदभाव, प्रांतिय भेदभाव, भाषेत भेदभाव, मला या सर्व गोष्टींतून भारताला मुक्त झालेलं पाहायचंय."
"सध्या देशात आयडॉलॉजिकल दहशतवाद सुरु आहे. देशाला तोडण्याचा काहीजण प्रयत्न करत आहेत. कोणी ओबीसींच्या नावावर, तर कोणी एसटी एससीच्या नावानं, तर कोणी धर्मांच्या नावानं, तर कोणी वेगवेगळ्या प्रांत आणि भाषांच्या नावानं हे मला पटतंच नाही. मला असं वाटतं की, एक अखंड भारत, ज्याचा पाया सरदार वल्लभभाई पटेल यांनी रचला आणि ज्या अखंड भारताचं स्वप्न पाहिलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी, ज्यासाठी संघर्ष केला महाराण प्रताप यांनी, या साऱ्यांचं बलिदान आपण विसरलो नाही पाहिजे आणि कोणत्याही परिस्थिती देशाला वेगळं करु दिलं नाही पाहिजे.", असं बाबा रामदेव म्हणाले.