(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ajit Pawar PC : जरंडेश्वर कारखान्याची विक्री ही उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार : अजित पवार UNCUT
पुणे : साताऱ्यातील जरंडेश्वर कारखान्याची विक्री ही मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार झाली होती, त्यामध्ये कारखान्यातील संचालक मंडळाचा कोणताही हात नव्हता असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. ईडीने कारखान्यावर केलेली ही कारवाई पहिलीच नाही, या आधीही अशा कारवाया झाल्या आहेत, त्यातून काहीही निष्पन्न झालं नसल्याचं अजित पवारांनी सांगितलं.
कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी साताऱ्यातील जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यावर ईडीने कारवाई केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सत्तेचा गैरवापर करुन या कारखान्याची विक्री केल्याचा आरोप शालिनीताई पाटील यांनी केला होता.
उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कारखान्याची विक्री झाल्याचं सांगत अजित पवार म्हणाले की, "उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर हा कारखाना बीव्हीजी कंपनीने चालवायला घेतला. पण त्यांना पहिल्या वर्षी मोठं नुकसान झाल्यानं माझ्या एका नातेवाईकाने, राजेंद्र घाडगे यांनी तो चालवायला घेतला. रितसर परवानग्या घेऊन त्यांनी हा कारखाना चालू केला होता. 300 ते 400 कोटी रुपयांचे कर्ज त्यांनी हा कारखाना उभा करण्यासाठी काढले होते. परंतु ईडीने त्यावर टाच आणली. आता ही टाच का आणली याच्या खोलात मी जात नाही. एखाद्या एजन्सीला चौकशी करण्याचा पूर्ण अधिकार आहे. यापूर्वी सीआयडी, एसीबी यांनी चौकशी केली आहे. त्यात त्यांना काही आढळले नाही. पण ईडीने नेमकी कशासाठी चौकशी सुरु केली हे अद्याप कळाले नाही."
अनेक कामगारांचे भवितव्य या कारखान्यावर अवलंबून आहे. त्यामुळे वकिलाचा सल्ला घेऊन कंपनीवर असणारे डायरेक्टर कोर्टात जातील असंही अजित पवारांनी सांगितलं.
अजित पवार यांनी सत्तेचा गैरवापर करुन आपल्याकडून हा कारखाना बळकावल्याचा आरोप जरंडेश्वर कारखान्याच्या संस्थापक आणि माजी संचालक शालिनीताई पाटील यांनी केला आहे. "देवाच्या काठीला आवाज नसतो. शंभर अपराध भरले की फटका बसतोच," अशी प्रतिक्रिया शालिनीताई पाटील यांनी ईडीच्या कारवाईवर दिली आहे.