Ajit Pawar Delhi : अजित पवार दिल्लीत! महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करण्याची शक्यता
Ajit Pawar Delhi : अजित पवार दिल्लीत! महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करण्याची शक्यता
मुंबई : लोकसभा निवडणुकांनंतर (Lok Sabha Election) महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची (Maharastra Vidhan Sabha Election) तयारी सुरू झाली आहे. मात्र, त्याआधी पार पडलेल्या विधानपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधानपरिषदेच्या निकालानंतर सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीला रवाना झाले आहेत. दादांची आजची दिल्लीवारी ही मंत्रिमंडळ विस्ताराच्या अनुषंगाने एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे.
अजित पवारांच्या दिल्ली दौऱ्यात महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांची भेट होण्याची शक्यता आहे. राज्यांतील विविध प्रश्नांच्या अनुषंगाने भेट असण्याची शक्यता आहे. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल देखील सोबत आहेत, अजित पवारांची ही भेट मंत्रीमंडळ विस्ताराबाबत असल्याची चर्चा आहे. मात्र अजित पवार दिल्लीत कोणाला भेटणार, कोणाशी चर्चा करणार, याचा तपशील अद्याप गुलदस्त्यात आहे. अजित पवारांच्या या दौऱ्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुरु असलेल्या घडामोडींविषयी उत्सुकता वाढली आहे.
लवकरच राज्यात मंत्रिमंडळ विस्तार
अजित पवार यांच्या अनपेक्षित दिल्लीवारीचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांमध्ये राज्यात होऊ घातलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत चर्चा करण्यासाठी अजित पवार हे दिल्लीत गेल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दिल्लीत मुख्यमंत्री आणि भाजपमधील वरिष्ठ नेत्यांची भेट झाल्याची शक्यता आहे. या भेटीत मंत्रिमंडळ विस्तार आणि महामंडळाचे वाटप याबाबत, चर्चा होण्याचा अंदाज आहे. दिल्लीवारीमुळे राज्यात लवकरच मोठ्या राजकीय हालचाली घडण्याचा अंदाज आहे. लवकरच राज्यात मंत्रिमंडळ विस्तार आणि महामंडळाचे वाटप होईल, अशी चर्चा सुरु झाली आहे.
दोन वर्षांपासून रखडलेल्या महामंडळाच्या नियुक्त्या करण्याची शक्यता
महायुती सरकारकडून मंत्रिमंडळ विस्तार करताना चांगली कामगिरी न केलेल्या मंत्र्यांना डच्चूही दिला जाऊ शकतो. तर भाजपकडून तरुण चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी दिली जाण्याची शक्यता आहे. यावेळी शिंदे गट आणि अजितदादा गटाकडून कोणत्या आमदारांना मंत्रीपदाची संधी दिली जाणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. याशिवाय,गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या महामंडळाच्या नियुक्त्याही यावेळी केल्या जातील, अशी चर्चा आहे.