Kolhapur Internet Seva Band : कोल्हापूर शहरातील संवेदनशील भागात 31 तास इंटरनेट सेवा बंद
ज्यांनी संपूर्ण जगाला जातीय सलोख्याचा मंत्र दिला त्या छत्रपती शाहूंच्या नगरीत तसेच, पुरोगामी असं बिरुद मिरवणाऱ्या कोल्हापुरात चाललंय तरी काय? असा प्रश्न महाराष्ट्रातील कुणालाही पडला असेल. कारण कोल्हापूर शहरातील शिवाजी चौकात आज सकाळपासून तणाव निर्माण झाला होता. कोल्हापूर शहरातील सात तरुणांनी त्यांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसला टिपू सुलतान आणि औरंगजेबाचे फोटो ठेवले. आणि इथंच वादाची ठिणगी पडली. या स्टेटस विरोधात आज हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. कार्यकर्ते आधी छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमले, नंतर ते मोर्चा काढणार होते. पण मोर्चा काढण्यास पोलिसांनी मनाई केली. यामुळे कार्यकर्ते आक्रमक झाले, आणि घोषणा देऊ लागले. अखेर त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. अश्रुधुराचाही वापरही करण्यात आला. दुपारी साडे बाराच्या सुमाराला स्थिती नियंत्रणात आली. दरम्यान, शिवाजी चौक आणि महापालिका मुख्यालय परिसरातील तणाव निवळून आता शांतता निर्माण झालीय.