Kolhapur : कुणाचा कंडका पडणार? छत्रपती राजाराम साखर कारखाना निवडणुकीचा आज निकाल
Rajaram Sakhar Karkhana : संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यासह अवघ्या पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर शहरातील कसबा बावड्यातील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचा निकाल आज (25 एप्रिल) लागणार आहे. कारखान्यासाठी रविवारी अत्यंत चुरशीने 91.12 टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीसाठी विरोधी सतेज पाटील आणि सत्ताधारी महाडिक गटाकडून सर्वस्व पणाला लावून मैदानात होते. महाडिक गटाच्या ताब्यात सध्या एकमेव कारखाना असल्याने हा निकाल बरंच काही सांगून जाणारा असेल, यात शंका नाही. दोन्ही गटाकडून या निकालातून आगामी सर्व निवडणुकीची रणनीती ठरवली जाईल, हे सुद्धा नव्याने सांगण्याची गरज नाही. कंडका पाडायचाच म्हणून सतेज पाटील निवडणूक रिंगणात होते. त्यामुळे कंडका पडणार? की महादेवराव महाडिकांची शिट्टी पुन्हा एकदा घुमणार याची उत्सुकता आहे.























