(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PM Narendra Modi on Kumbh Mela | कोरोनाचे संकट लक्षात घेऊन कुंभमेळ्याची सांगता करावी : पंतप्रधान
नवी दिल्ली : शुक्रवारी देशात तब्बल 2.34 लाख कोरोनाचे नवे रुग्ण सापडल्याने देशातील स्थिती चिंताजनक बनली आहे. त्या पार्श्वभूमीवर हरिद्वार येथे कुंभमेळ्यातील गर्दी आणि कोरोनाच्या प्रसाराचा धोका लक्षात घेऊन या कुंभमेळ्याची सांगता करावी अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आखाडा परिषदेकडे केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी यांच्याशी फोनवरून चर्चा केली. त्यामध्ये त्यांनी आतापर्यंत संतांनी प्रशासनाला केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. आतापर्यंत दोन शाही स्नान झाले असल्याने कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कुंभमेळा प्रतिकात्मक ठेवावा आणि त्याची सांगता करावी अशी विनंती त्यांनी केली. त्यामुळे कोरोना विरोधातल्या लढ्याला बळ मिळेल असंही पंतप्रधानांनी सांगितलं.
हरिद्वारमध्ये सुरु असलेल्या कुंभमेळ्यातही कोरोनाचा उद्रेक बघायला मिळत आहे. कुंभमेळ्यात कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत असून अनेक आखाड्यांच्या साधू - संतांना संसर्ग झाला आहे. त्यामुळे निरंजनी आखाडा आणि आनंद आखाडा या दोन आखाडयांनी 17 एप्रिल रोजीच कुंभ समाप्तीचा निर्णय घेतला आहे.