Parliament Security Breach : संसदेवरील घुसखोरी प्रकरणातील 6 व्या आरोपीला अटक
Parliament Security Breach : संसदेवरील घुसखोरी प्रकरणातील 6 व्या आरोपीला अटक बुधवारी संसदेत झालेल्या हल्ल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी अटकेचा धडाका लावला आहे. शनिवारी या प्रकरणातील सहाव्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. या आरोपीची ओळख पटली असून त्याचं नाव महेश कुमावत असं आहे. महेश हा या संपूर्ण हल्ल्याच्या कारस्थानात सहभागी होता, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. राजस्थानच्या नागौर जिल्ह्याचा रहिवासी असलेला महेश हा 13 डिसेंबर रोजी दिल्लीला आला होता. याच दिवशी दोन जणांनी प्रेक्षकांच्या गॅलरीतून लोकसभा कक्षात उडी मारली आणि स्मोक बॉम्बने धूर उडवला. या घटनेनंतर देशात एकच गहजब उडाला. या संपूर्ण हल्ल्याचा सूत्रधार ललित झा या हल्ल्यानंतर दिल्लीतून पसार झाला आणि महेशच्या घरीच लपला होता. सुरुवातीला अटक करण्यात आलेल्या चार आरोपींचे मोबाईल नष्ट करण्यात महेशने ललितला मदत केली होती. या घटनेत संसदेबाहेर आंदोलन करणाऱ्या नीलम देवी हिच्याही संपर्कात महेश होता. नीलम हिच्यासह महेशच्या अन्य साथीदारांना अटक झाली तरी तो शरण आला नव्हता. अखेर त्याला अनेक तास चौकशी केल्यानंतर अटक करण्यात आली.