Pahalgam Terror Attack |हल्ल्यानंतर 4 दहशतवाद्यांचा एक गट फिरताना दिसला,सुरक्षादलांच्या मोहिमेला वेग
Pahalgam Terror Attack |हल्ल्यानंतर 4 दहशतवाद्यांचा एक गट फिरताना दिसला,सुरक्षादलांच्या मोहिमेला वेग
India Vs Pak Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याला आज एक आठवडा पूर्ण झाला आहे. लष्कराने आणि इतर सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधात कारवाई वेगाने सुरू केली. पहलगामलगतच्या कोकरनाग जंगलाला (Kokernag Forest) वेढा देण्यात आलाय. या जंगलात दहशतवादी लपल्याची शक्यता आहे. जमिनीवरील शोध मोहिमेसह ड्रोन आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह संपूर्ण जंगलाचा कसून शोध घेतला जात आहे. दरम्यान या जंगलात चार दहशतवाद्यांची (Terrorists) एक टोळी अनेकदा दिसल्याची माहिती समोर आली आहे. भारतीयसुरक्षा दलांसह (Indian Army) त्यांची चकमकही झालीय. मात्र, पहलगाममध्ये हल्ला (Pahalgam Attack) करणारे हे तेच दहशतवादी आहेत का, याचा शोध अद्याप लागलेला नाही. भारतीय सैन्याकडून ड्रोनद्वारे कोकरनाग जंगल परिसरात टेहळणी केली जात असून या दहशतवादी टोळीचा शोध युद्धपातळीवर सुरु आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून सध्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्याचा कसून तपास सुरु आहे. दहशतवादी कुठून आले होते, याची माहिती गोळा केली जात आहे. दहशतवादी पहलगामपर्यंत कोणत्या मार्गाने आले, हल्ल्यानंतर कुठे गेले याचा सध्या कसून तपास सुरू आहे. त्यासाठी बैसरन व्हॅलीत सापडलेली काडतुसांच्या पुंगळ्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्या आहेत. तसेच या भागातील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी सुरु आहे. श्रीनगर परिसरात प्रत्येक चौकीवर सुरक्षा दलांकडून नागरिकांची कसून चौकशी केली जात आहे. कोण कशासाठी आले आहे, ही माहिती विचारली जात आहे. या भागातील हॉटेल्समध्येही सुरक्षा दल आणि पोलिसांकडून कसून शोध घेतला जात आहे.























