India Sri lanka Match : रोहित शर्माच्या भारतीय संघाकडून श्रीलंकेचा 41धावांनी पराभव
रोहित शर्माच्या भारतीय संघानं श्रीलंकेचा ४१ धावांनी पराभव करून आशिया चषकाच्या सुपर फोरमध्ये सलग दुसरा विजय साजरा केला. या सामन्यात भारतानं श्रीलंकेला विजयासाठी २१४ धावांचं माफक लक्ष्य दिलं होतं. पण भारतीय आक्रमणासमोर श्रीलंकेचा डाव ४१.३ षटकांत १७२ धावांत गडगडला. भारताच्या कुलदीप यादवनं चार, जसप्रीत बुमरा,आणि रवींद्र जाडेजानं प्रत्येकी दोन गडी बाद केले.. तर मोहम्मद सिराज, हार्दिक पंड्यानं प्रत्येकी एक गडी बाद केला... या विजयासह भारतानं आशिया चषकातील अंतिम सामन्यात स्थान निश्चित केला आहे. त्याआधी, श्रीलंकेच्या फिरकी आक्रमणासमोर भारतीय फलंदाजीही पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली. श्रीलंकेच्या दुनिथ वेल्लालगे आणि चरिथ असलंका या फिरकी गोलंदाजांनी भारताला ४९ षटकं आणि एका चेंडूत सर्व बाद २१३ धावांत रोखलं होतं. भारताच्या डावात रोहित शर्मानं ५३, ईशान किशननं ३३ आणि लोकेश राहुलनं ३९ धावांची खेळी उभारली. श्रीलंकेचा डावखुरा स्पिनर दुनिथ वेल्लालगेनं ४० धावा मोजून भारताचा निम्मा संघ माघारी धाडला. चरिथ असलंकानं १८ धावांत चार विकेट्स घेऊन त्याला छान साथ दिली.