Dhule Update :अनोखा एकोपा! धुळ्यात मुस्लिम शेतकर्याने श्रद्धेपोटी स्वखर्चातून साकारले महादेव मंदिर
धुळे : धुळे तालुक्यातील बिलाडी येथे मुस्लिम समाजातील शेतकरी सांडू सुमन पिंजारी यांनी भगवान महादेवावरील श्रद्धेतून गावात सर्वात मोठे महादेव मंदिर उभारले. मंदिरासाठी सांडू सुमन पिंजारी यांनी कुणाकडूनही एक रुपया देणगी घेतली नाही. त्यांनी स्वकष्टातून जमवलेल्या पैशातून मंदिर उभारले आहे. मंदिरात नुकतीच महादेवाची पिंड, नंदी आणि पार्वतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
हिंदू-मुस्लिम समाजात एकोपा नांदावा यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न होत आहे. दोन्ही समाज एकमेकांच्या सण, उत्सवात सहभागी होऊन एकसंघतेचे दर्शन घडवतात. धुळे तालुक्यातील बिलाडी गावात असा सामाजिक एकोपा दिसून आला. बिलाडी येथे दहा ते बारा मुस्लिम कुटुंबांचे वास्तव्य आहे. या ठिकाणी राहणारे मुस्लिम समाजातील सांडू सुमन पिंजारी शेती करतात. त्यांचे दोन मुले ट्रॅक्टरचालक म्हणून काम करतात. त्यांची कौटुंबिक परिस्थिती बेताची आहे. सांडू पिंजारी यांची भगवान महादेवावर नितांत श्रद्धा आहे. या श्रद्धेतून त्यांनी स्वत:च्या शेतात महादेवाचे मंदिर उभारण्याचा संकल्प केला. हा संकल्प तडीस नेण्यासाठी त्यांनी पाच वर्षांपूर्वी शेतात मंदिराच्या बांधकामाला सुरुवात केली. गावातील मुस्लिम व्यक्ती मंदिर उभारत असल्यामुळे अनेकांनी त्यांना मदत करण्यासाठी हात पुढे केले. मात्र, सांडू पिंजारी यांनी कुणाकडूनही मदत न घेता मंदिर उभारले. त्यांनी गेल्या पाच वर्षांत शेतातून मिळालेले उत्पन्न, मुलांनी केलेल्या आर्थिक मदतीतून मंदिराचे काम केले. या मंदिराचे काम नुकतेच पूर्ण झाले. त्यानंतर मंदिरात भगवान महादेवाची पिंड, पार्वती आणि नंदी अशा तीन मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्यापूर्वी गावातून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत गावातील नागरिकांनी सहभाग नोंदवला. तसेच रविवारी भंडारा वाटप करण्यात आला. दरम्यान, संपूर्ण पिंजारी कुटुंबाने मंदिरात पूजाविधीही केला.
बिलाडी गावात पिंजारी समाजाचे दहा ते बारा कुटुंबे असून ही कुटुंबे गावाच्या विविध कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. एकीकडे हिंदू-मुस्लीम एकोपा जोपासण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात असताना दुसरीकडे मात्र धुळे तालुक्यातील बिलाडी गाव हे हिंदू-मुस्लिम एकोप्याचे आदर्श उदाहरण म्हणावे लागेल, पिंजारी यांनी बांधलेल्या महादेवाच्या मंदिराची संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे.
निवडणुकीतही सामाजिक एकोपा :
विशेष बाब म्हणजे बिलाडी गावात ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे. राजकीय मतभेद बाजूला ठेवत सर्वांनी सांडू पिंजारी यांच्या महादेव मंदिराच्या संकल्पपूर्ती कार्यक्रमात एकदिलाने सहभाग नोंदवला.