Zero Hour : महायुतीत शिवसेनेची भूमिका ते अर्ज भरण्यासाठी नेत्यांचं शक्तिप्रदर्शन सविस्तर चर्चा
Zero Hour : महायुतीत शिवसेनेची भूमिका ते अर्ज भरण्यासाठी नेत्यांचं शक्तिप्रदर्शन सविस्तर चर्चा
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपाची खलबतं सुरू आहेत. पण तरीही आजचा मुहूर्त साधून दोन्ही आघाड्यांमधल्या प्रमुख उमेदवारांनी आपापला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याआधी या उमेदवारांनी आपापल्या समर्थकांसह त्या त्या शहरात मिरवणुका काढून शक्तिप्रदर्शनाची संधी साधली. या बड्या उमेदवारांच्या मिरवणुकांमुळं त्यांच्या शहरात वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं. ही वाहतूक कोंडी त्या उमेदवारांना आपल्या शहराची, तिथल्या सर्वसामान्य माणसांची खरोखरच काळजी आहे का, असा प्रश्न निर्माण करणारी होती. याच बातमीचं विश्लेषण करणार आहोत... पण सुरुवात महायुतीच्या बातमीनं.. मंडळी, आजची सर्वात महत्त्वाची बातमी आली ती महायुतीच्या गोटातून. महायुतीच्या जागावाटपाबद्दल दिल्लीतली महायुतीची बैठक संपली... केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक सुरु होती. या बैठकीत महायुतीच्या जागावाटपाबद्दल तोडगा निघालाय.. पालघर, बोईसर, वसई विरार आणि नालासोपारा या मतदारसंघावरुन भाजप शिवसेनेत सुरु असलेला वाद संपण्याची चिन्हं आहेत.. वसई विरार, पालघर, बोईसर या जागा भाजप शिंदेंच्या शिवसेनेसाठी सोडणार आहे.. तर नालासोपाऱ्याची जागा भाजपला मिळण्याची शक्यता आहे.. लोकसभा निवडणुकीतील स्ट्राईक रेट लक्षात घेऊन आपल्या शिवसेनेला जास्त जागा मिळाव्यात अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भाजप नेते अमित शाहांशी बोलताना केल्याचं समजतं. लोकसभेला आम्ही तुमचं ऐकलं, काही जागांवरील आमचे उमेदवारही बदलले, मात्र आता परिस्थिती थोडी वेगळी आहे, त्यामुळं शिवसेनेच्या वाट्याला अधिक जागा आल्या पाहिजेत, अशी काहीशी ताठर भूमिका एकनाथ शिंदेंनी घेतल्याचं समजतं. महायुतीनं आतापर्यंत १८२ जागा जाहीर केल्या आहेत. म्हणजेच महायुतीतल्या जागावाटपात अजूनही १०६ जागांचा अंतिम निर्णय अजूनही प्रलंबित आहे. त्यासाठीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीला गेले होते. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे क्रमांक दोनचे नेते अमित शाहा यांच्यासोबत बैठक घेऊन महायुतीचे हे तीन नेते मुंबईच्या दिशेनं रवाना झाले आहेत.