Punjab New CM : पंजाबमध्ये काँग्रेसची जातीय खेळी, आगामी निवडणुकीत फायदा होणार? Special Report
नवी दिल्ली : पंजाबच्या मुख्यमंत्रिपदावर काँग्रेसनं चरणजितसिंह चन्नी यांची निवड करुन अनेकांना धक्का दिला. राजकीयदृष्ट्याही काँग्रेसची ही चाल महत्वाची आहे. कारण दलित लोकसंख्येचं सर्वाधिक प्रमाण असलेल्या पंजाबला पहिला दलित मुख्यमंत्री चन्नी यांच्या रुपानं मिळाला आहे.
पंजाबच्या मुख्यमंत्रिपदासाठी शर्यतीत नावं तर खूप होती. पण अखेर काँग्रेसनं चरणजित सिंह चन्नी यांची निवड केली. चन्नी यांच्या रुपानं पंजाबला पहिला दलित मुख्यमंत्रीही मिळाला आहे. पंजाबमध्ये दलितांची संख्या जवळपास 33 टक्के आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची ही खेळी यशस्वी होणार का प्रश्न आहे.
देशात सर्वाधिक दलित लोकसंख्येचं प्रमाण असलेलं राज्य कुठलं हा प्रश्न विचारल्यावर पटकन पंजाबचं नाव कुणाच्याही डोक्यात येत नाही. पण पंजाबमध्ये 33 ते 34 टक्के लोकसंख्या दलित आहे. यूपी बिहारपेक्षाही जास्त आहे. काशीराम यांचा जन्म पंजाबचा, त्यांच्या मुशीत तयार झालेल्या मायावतींनी यूपीत सत्ता मिळवली. पण पंजाबमध्ये आजवर दलित मुख्यमंत्री होऊ शकला नव्हता.
इतकी मोठी लोकसंख्या असल्यानं साहजिकच दलित व्होट बँक ही पंजाबच्या राजकारणात निर्णायक आहे. अनेक पक्षांनी तशी आश्वासनंही दिली. भाजपनं पंजाबमध्ये सत्ता आल्यानंतर दलित मुख्यमंत्री होईल अशी घोषणाही केली होती. पण मुळात भाजपची स्वत:ची ताकद पंजाबमध्ये कमी. शिरोमणी अकाली दलानंही हीच व्होट बँक डोळ्यासमोर ठेवून मायावतींना सोबत घेतलं, उपमुख्यमंत्री दलित करु असं सांगितलं. पंजाबमध्ये पाय रोवू पाहणाऱ्या आपला मागच्या वेळी जे यश मिळालं ते याच मतांच्या जोरावर.