Special report | शेतकऱ्यांची स्थिती दयनीय; शेतकरी खासदार श्रीमंत
अवेळी पाऊस, अस्थिर कमाई यामुळे देशातल्या अनेक शेतकऱ्यांची स्थिती आता शेती नको अशी झाली असली तरी राजकारण्यांना मात्र हीच शेती अत्यंत हवीहवीशी वाटते. भाषणामध्ये उठताबसता त्यांना शेतकरी असल्याचा भाव आणावा लागतोच. पण व्यवहारातही शेतकरी ही ओळख त्यांना कमाई लपवण्याचे बरेच मार्ग उपलब्ध करुन देते. आज दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाला 100 दिवस पूर्ण होतायत.
देशात सध्या 538 खासदारांपैकी 216 खासदार हे शेतकरी आहेत. इतकंच काय मोदींच्या सध्याच्या मंत्रिमंडळात एकूण 21 कॅबिनेट मंत्री आहेत. त्यापैकी 7 शेतकरी आहेत. म्हणजे देशात जवळपास दोन खासदारांपैकी एक हा शेतकरीच असतो, तर तीन मंत्र्यांपैकी एक जण शेतकरी आहे. आता तुम्ही म्हणाल यात काय नवीन आहे. शेतीचा राजकारणातल्या भाषणांसाठी आणि कमाई लपवण्यासाठी वापर फार आधीपासूनच होतोय. पण आता दिल्लीतलं शेतकरी आंदोलन जेव्हा 100 दिवस पूर्ण करतंय, तेव्हा या आकडेवारीचा आढावा घेऊयात.