Saat Barachya Batmya : 7/12: सात बाराच्या बातम्या :90 गुंठे संत्र्यापासून 35 ते 36लाख रुपये उत्पन्न
वाशीमच्या वनोजा परिसरात संत्रा शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. पुरुषोत्तम राऊत या अल्पभूधारक शेतकऱ्याने सुद्धा या नगदी पिकावर विश्वास टाकला. याचं चांगलं फळ त्यांना मिळालं. गेल्या तीन वर्षात ९० गुंठे संत्र्यापासून ३५ ते ३६ लाख रुपये उत्पन्न त्यांनी मिळवलं आहे. यंदा त्यांना १९ ते २० लाख रुपये मिळणार आहेत. पुरुषोत्तम राऊत आधी आपल्या शेतात पारंपरिक पद्धतीने सोयाबीन, तुर, हरबरा याचे पिक घेत होते. मात्र २०१६ साली २ एकरात त्यांनी साडे चारशे जंबेरी संत्रा रोपांची लागवड केली. २० बाय १२ फूटाचं अंतर ठेवलं. उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर केला आणि इतर निविष्ठांचं योग्य नियोजन केलं. या वर्षी त्यांच्या संत्राबागेतील फळांची व्यापाऱ्यांमध्येही चर्चा झाली. व्यापाऱ्यांनी ७०० रुपये क्रेट दराने संत्रा बाग मागितला. राऊत यांना २,८०० क्रेट संत्रा निघेल अशी अपेक्षा आहे, म्हणजे त्यांना अंदाजे १९ लाख ६० हजार रुपये उत्पन्न मिळणार आहेत. २०२०-२१ मध्ये राऊत यांनी तेरा लाख तीस हजाराला संत्रा बगीचा विकला होता. त्यानंतर दुसऱ्या वर्षी उन्हाळ्यामध्ये जास्त पाणी देता आलं नाही तसेच इतर व्यवधानांमुळे कमी फळधारणा झाली आणि त्यांना फक्त तीन लाख चाळीस हजाराचं उत्पन्न मिळालं. पण हार न मानता त्यांनी कष्ट उपसले आणि यंदा पुन्हा १९ लाखांवर उत्पन्न मिळवून दाखवलंय. अल्पभूधारक शेतकऱ्यांनी जर संत्रा बागेचं योग्य नियोजन केलं तर लखपती होणं शक्य आहे हेच पुरुषोत्तम राऊत यांनी दाखवून दिलंय.