Twitter New CEO: लिंडा याकारिनो ट्विटरच्या नव्या CEO; एलॉन मस्क यांची अधिकृत घोषणा
Linda Yaccarino: ट्विटरचे मालक आणि अब्जाधीश एलॉन मस्क यांनी ट्वीट करुन नव्या सीईओ म्हणून लिंडा याकारिनो यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली आहे.
Twitter New CEO Linda Yaccarino: एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटरच्या सीईओ (CEO) पदावरुन पायउतार होणार असल्याची घोषणा केली आणि संपूर्म जगभरात एकच खळबळ माजली. आता एलॉन मस्क काय करणार? ते खरंच सीईओ पद सोडणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले. अशातच एलॉन मस्क यांनी स्वतः ट्वीट करत ट्विटरला नव्या सीईओची गरज आहे आणि एक महिला ट्विटरची सूत्रं हाती घेईल, असं ट्वीट केलं होतं. आता एलॉन मस्क यांनी पुन्हा एक ट्वीट करुन ट्विटरच्या नव्या सीईओच्या नावाची घोषणा केली आहे.
ट्विटरचे मालक एलॉन मस्क यांनी शुक्रवारी (12 मे) रोजी एक ट्वीट केलं, त्या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलंय की, "मी ट्विटरच्या नव्या सीईओ म्हणून लिंडा याकारिनो (Linda Yaccarino) यांचं स्वागत करण्यास उत्सुक आहे." लिंडा प्रामुख्यानं व्यवसाय ऑपरेशन्सवर लक्ष केंद्रीत करतील, तर मी उत्पादन डिझाइन आणि नवीन तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रीत करेन. ट्विटरला सर्व गोष्टींसह अॅप 'X' मध्ये रूपांतरित करण्यासाठी लिंडासोबत काम करण्यास उत्सुक आहे."
I am excited to welcome Linda Yaccarino as the new CEO of Twitter!@LindaYacc will focus primarily on business operations, while I focus on product design & new technology.
— Elon Musk (@elonmusk) May 12, 2023
Looking forward to working with Linda to transform this platform into X, the everything app. https://t.co/TiSJtTWuky
लिंडा याकारिनो सीईओ मग एलॉन मस्क काय करणार?
लिंडा याकारिनो यांच्या नावाची घोषणा करण्यापूर्वी एलॉन मस्क यांनी एक ट्वीट केलं होतं. त्या ट्वीटमध्ये त्यांनी नवे सीईओंची नियुक्ती झाल्यानंतर कंपनीत ते स्वतः काय भूमिका पार पाडणार, यासंदर्भात सांगितलं होतं. त्यांनी ट्वीट केलं होतं की, "ट्विटरसाठी नव्या सीईओंची निवड केल्याचं जाहीर करताना मला आनंद होत आहे. येत्या सहा आठवड्यांत त्या पदभार स्वीकारतील. राजीनामा दिल्यानंतर माझी भूमिका कार्यकारी अध्यक्ष आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी अशी असेल."
लिंडा याकारिनो कोण आहेत?
ट्विटरच्या सीईओ पदी एक महिला विराजमान होणार अशी घोषणा एलॉन मस्क यांनी करताच अनेक नावांच्या चर्चा रंगल्या होत्या. या सर्व नावांमध्ये लिंडा याकारिनो यांचंही नाव चर्चेत होतं. लिंडा याकारिनो यांच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, याकारिनो 2011 पासून एनबीसी युनिव्हर्सलमध्ये काम करत आहेत. त्या सध्या ग्लोबल अॅडव्हर्टायझिंग आणि पार्टनरशिप्सच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. याआधी त्यांनी कंपनीच्या केबल एंटरटेनमेंट आणि डिजिटल जाहिरात विक्री विभागासाठी काम केलं आहे.
याकारिनो यांनी टर्नर कंपनीत 19 वर्ष कामही केलं. 1981 ते 1985 या काळात त्यांनी पेन स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये (Penn State University) शिक्षण घेतलं. त्यांनी लिबरल आर्ट्स आणि टेलिकम्युनिकेशन विषयात शिक्षण घेतलं आहे.