(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ram Mandir Cyber Fraud : राम मंदिराच्या नावावर फ्री रिचार्जची लिंक आलीय? क्लिक करण्याआधी ही बातमी वाचा
Ayodhya Ram Mandir Cyber Fraud : राम मंदिराच्या नावाखाली त्यांच्याकडून लोकांची फसवणूक सुरू झाली आहे. तुम्ही दाखवलेला थोडासा निष्काळजीपणादेखील तुमचं मोठं आर्थिक नुकसान करू शकतो.
Ayodhya Ram Mandir Cyber Fraud : अयोध्येतील श्री रामजन्मभूमी येथे आज राम मंदिरात (Ram Mandir) प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. संपूर्ण देशात आज उत्साहाचे वातावरण आहे. तर, दुसरीकडे सायबर गुन्हेगार सक्रीय झाले आहेत. राम मंदिराच्या नावाखाली त्यांच्याकडून लोकांची फसवणूक सुरू झाली आहे. तुम्ही दाखवलेला थोडासा निष्काळजीपणादेखील तुमचं मोठं आर्थिक नुकसान करू शकतो.
सायबर गुन्हेगार सक्रीय
देशात अयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्रीराम प्राण प्रतिष्ठापनाचा उत्साह दिसून येत असताना दुसरीकडे सायबर गुन्हेगार सक्रीय झाले आहेत.सामान्य लोकांच्या भावनांना हात घालून त्यांची आर्थिक फसवणूक केल्याचे प्रकार समोर आले आहेत.देशातील विविध भागात अशी प्रकरणे समोर आली आहेत, ज्यामध्ये सायबर ठगांनी रामच्या नावाने फ्री रिचार्जची लिंक पाठवली आहे. लोकांनी त्यावर क्लिक केले आणि त्यांचे पैसे गमावले. या पार्श्वभूमीवर फरीदाबाद पोलिसांनी नुकतीच एक सूचनाही जारी केली आहे.
फसवणुकीची पद्धत काय?
दिल्ली पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, राम मंदिराच्या उद्घाटनाच्या नावाखाली लोकांना मोफत रिचार्ज करण्याचे आमिष दाखवले जात आहे. दुसरा मार्ग म्हणजे राम मंदिराच्या प्रसादाची मोफत होम डिलिव्हरी करणे, अशा आमिषाने एक लिंक पाठवली जाईल आणि त्यावर क्लिक करण्यास सांगितले जाईल. चुकूनही अशा कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका, असे आवाहन त्यांनी केले.
एखादी धार्मिक संस्था तुम्हाला प्रसाद पाठवेल का?
काही ठग स्वतःला राम मंदिराशी संबंधित असल्याचे सांगत लिंक पाठवत आहेत. आज लाखो भाविक अयोध्येत येत आहेत तर तिथे प्रत्येकासाठी व्यवस्था नाही. अशा परिस्थितीत त्यांना तुमच्या घरी प्रसाद मोफत पोहोचवण्याचा अधिकार देण्यात आला असल्याचा दावा त्यांनी केला आहे. सायबर चोर तुम्हाला एक लिंक देऊन त्यावर क्लिक करून तुमचे नाव, पत्ता आणि इतर काही माहिती भरण्यास सांगतील. ही माहिती नमूद करत असताना तुम्ही फसवणुकीचे बळी ठराल.
अशा मेसेजकडे दुर्लक्ष करा
दिल्ली, मुंबई, हरयाणासह इतर राज्यातील पोलिसांनीदेखील सामान्यांना सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. अयोध्येतील राम मंदिर व्यवस्थापनाने कोणालाही प्रसाद घरपोच करण्याचे अधिकार दिले नाहीत. कोणत्याही आमिषाला बळी न पडता कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.