Hulk Hogan Death News : WWE चा सुपरस्टार काळाच्या पडद्याआड; हृदयविकाराच्या झटक्याने हल्क होगन यांचे निधन, वयाच्या 71 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Wrestling legend Hulk Hogan dies aged 71 News : जगप्रसिद्ध रेसलिंग स्टार टेरी बोलिया ज्यांना संपूर्ण जग 'हल्क होगन' या नावाने ओळखतं, यांचं 71 व्या वर्षी दुःखद निधन झालं.

Hulk Hogan Death News : जगप्रसिद्ध रेसलिंग स्टार टेरी बोलिया ज्यांना संपूर्ण जग 'हल्क होगन' या नावाने ओळखतं, यांचं 71 व्या वर्षी दुःखद निधन झालं. त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. गुरुवारी सकाळी त्यांच्यावर अचानक वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती ओढावली. तत्काळ उपचार मिळवूनही त्यांना वाचवता आलं नाही. त्यांना स्ट्रेचरवरून त्यांच्या घरातून जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र तिथे त्यांची प्राणज्योत मालवली.
1980 आणि 1990 च्या दशकात हल्क होगन हे नाव केवळ WWE साठी मर्यादित नव्हतं, तर ते एक ‘पॉप कल्चर आयकॉन’ बनलं होतं. त्यांच्या दमदार शरीरयष्टी आणि करिष्माई व्यक्तिमत्त्व यामुळे ते प्रत्येक घरात ओळखले जात होते. केवळ WWE च नाही, तर त्यांनी काही हॉलिवूड चित्रपटांतही अभिनय करून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती.
11 ऑगस्ट 1953 रोजी जॉर्जिया, ऑगस्टा येथे जन्मलेले हल्क होगन हे प्रोफेशनल रेसलिंगच्या इतिहासातील सर्वात प्रतिष्ठित आणि प्रभावशाली व्यक्तींपैकी एक मानले जातात. त्यांना दोन वेळा WWE हॉल ऑफ फेममध्ये स्थान मिळालं, एकदा 2005 मध्ये वैयक्तिक कामगिरीसाठी आणि दुसऱ्यांदा 2020 मध्ये ‘NWO’ (न्यू वर्ल्ड ऑर्डर) गटाचा सदस्य म्हणून.
WWE कडून श्रद्धांजली
WWE ने अधिकृत निवेदनातून हल्क होगन यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. WWE ने म्हटलं की, “1980 च्या दशकात WWE ला आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून देण्यात हल्क होगन यांचा मोठा वाटा होता. त्यांचा प्रभाव फक्त WWE नाही, तर संपूर्ण पॉप-Culture वर होता. WWE ने होगनचे कुटुंब, मित्र आणि चाहत्यांसाठी शोक व्यक्त केला आहे."
WWE is saddened to learn WWE Hall of Famer Hulk Hogan has passed away.
— WWE (@WWE) July 24, 2025
One of pop culture’s most recognizable figures, Hogan helped WWE achieve global recognition in the 1980s.
WWE extends its condolences to Hogan’s family, friends, and fans.
‘NWO’ आणि नव्या युगाची सुरुवात
1996 मध्ये हल्क होगन यांनी स्वतःला पुन्हा एकदा नव्या रूपात सादर केलं. त्यांनी ‘न्यू वर्ल्ड ऑर्डर’ (NWO) या ग्रुपची स्थापना केली आणि रेसलिंगच्या दुनियेत एक नवा क्रांतिकारक बदल घडवून आणला. या टप्प्याने ‘WCW’ (वर्ल्ड चॅम्पियनशिप रेसलिंग) साठी लोकप्रियतेचा नवा अध्याय सुरू केला.
विवाद आणि पुनरागमन
2015 मध्ये त्यांच्या एका खाजगी रेकॉर्डिंगमधून वादग्रस्त वर्णद्वेषात्मक विधानं समोर आली होती. त्यामुळे त्यांना WWE हॉल ऑफ फेममधून तात्पुरतं वगळण्यात आलं. मात्र पुढे कायदेशीर लढतीनंतर त्यांना पुन्हा मान्यता देण्यात आली आणि ते WWE हॉल ऑफ फेममध्ये परतले.
एक पर्व संपलं… पण इतिहासात अजरामर झालं
हल्क होगन यांनी केवळ रिंगमध्ये नव्हे, तर चाहत्यांच्या मनात कायमचं स्थान निर्माण केलं होतं. त्यांच्या जाण्याने रेसलिंगमध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. पण त्यांच्या शौर्याचा, करिष्म्याचा आणि संघर्षाचा वारसा अजून अनेक वर्षं प्रेरणा देत राहील.
























