(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ऑलिम्पिक पदकविजेता सुशील कुमारला 6 दिवसांची पोलीस कोठडी; 23 वर्षीय कुस्तीपटूच्या हत्याप्रकरणात अटक
ऑलिम्पिक पदकविजेता रेसलर सुशील कुमार याला दिल्लीच्या रोहिणी कोर्टाने 6 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
नवी दिल्ली : छत्रसाल स्टेडियममध्ये 23 वर्षीय कुस्तीपटू सागर धनखरच्या हत्येप्रकरणी अटक झालेल्या ऑलिम्पिक पदकविजेता कुस्तीपटू सुशील कुमारला दिल्लीच्या रोहिणी कोर्टाने 6 दिवसांच्या पोलिस कोठडीत पाठवले आहे. सुशीलचा साथीदार अजय यालाही कोर्टाने 6 दिवसांच्या पोलिस रिमांडवर पाठवले आहे.
दिल्ली पोलिसातील सूत्रांनी सांगितले की, ज्या व्हिडिओमध्ये सागरला मारहाण केली जात आहे, तो चित्रित करण्यामागे सर्किटमध्ये वर्चस्व राहावे आणि कोणीही त्याला विरोध करणार नाही, असा सुधीलचा हेतू होता. सुशीलनेच प्रिन्सला व्हिडीओ बनविण्यास सांगितले होते. मात्र, सागरचा मृत्यू झाल्याने आरोपी पळून गेले.
सुशील कुमारविरोधात ठोस पुरावे असून त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी दिवंगत कुस्तीपटू सागर धनखरच्या वडिलांनी केलीय. ते म्हणाले की माझा कायद्यावर पूर्ण विश्वास आहे.
20 दिवसानंतर दिल्लीच्या मुंडका येथून आरोपीला अटक
ऑलिम्पिक पदकविजेता सुशील कुमार आणि त्याचा साथीदार अजय यांना 20 दिवसानंतर अटक करण्यात आली आहे. आपल्या साथीदाराबरोबर एकाला भेटायला स्कूटीवर जात असताना सकाळी सुशील कुमार व त्याचा साथीदार अजय याला दिल्ली पोलिसांनी मुंडका मेट्रो स्टेशनवरून अटक केली.