(Source: Poll of Polls)
Ravi Kumar Dahiya : कुस्तीपटू रवी दहियाला आशियाई चॅम्पियनशिपमध्ये 'सुवर्ण' पदक, बजरंग पुनियाला रौप्य
Ravi Kumar Dahiya : कुस्तीपटू रवी कुमार दहियाने आशियाई चॅम्पियनशिपमध्ये 'सुवर्ण' पदक पटकावले आहे. तर बजरंग पुनियाला रौप्य पदक मिळाले आहे.
Ravi Kumar Dahiya : भारताचा ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू रवी कुमार दाहियाने (Ravi Kumar Dahiya) याने आशियाई चॅम्पियनशिपमध्ये (Asian Championship) सुवर्णपदक (Gold Medal) पटकावले आहे. रवी दहियाने 57 किलो वजनीगटात कझाकिस्तानच्या रखात कालझहानला पराभूत करत सुवर्ण पदकावर नाव कोरले आहे. या पदकासह रवी दहियाने आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदकाची हॅट्ट्रिक केली आहे. याच स्पर्धेत कुस्तीपटू बजरंग पुनियाने (Bajrang Punia) रौप्यपदक पटकावले आहे.
मंगोलियाची राजधानी उलानबाटर येथे आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत रवी दहियाने रौप्य पदक पटकावले होते. त्यानंतर आता त्याने आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदकाची हॅट्ट्रिक केली आहे. सामना सुरू झाल्यानंतर रवी पिछाडीवर होता. परंतु, त्यानंतर त्याने जोरदार कमबॅक करत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले.
आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत रवी याने जपानच्या रिकुटो आराईला प्रथम पराभूत केले. त्यानंतर त्याने मंगोलियाच्या झानाबाझार झानदानबुदचा पराभव केला. झानदानबुदचा पराभव करून रवी याने स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला. फायनमध्ये त्याने कालझहानचा पराभव केला.
बजरंग पुनियाला रौप्य
आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत कुस्तीपटू बजरंग पुनियाने 65 किलो वजणी गटात रौप्यपदक पटकावले आहे. अंतिम फेरीत इराणच्या रहमान मुसाने बजरंगचा 3-1 ने पराभव केला. त्यामुळे बजरंगला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
दरम्यान, काल झालेल्या स्पर्धेत भारतीय महिला कुस्तीपटू अंशू मलिक आणि राधिका यांनी शुक्रवारी आशियाई कुस्ती स्पर्धेत आपापल्या 57 किलो आणि 65 किलो गटात रौप्य पदक जिंकले आहे. तर मनीषाने 62 किलो गटात कांस्यपदक पटकावले. कुस्तीपटू अंशू मलिकने अंतिम फेरीत प्रवेश केला, परंतु 57 किलो गटाच्या अंतिम फेरीत तिला जपानच्या त्सुगुमी साकुराईकडून 0-4 असा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे अंशूला सुवर्णपदकापासून वंचित राहावे लागले.
महत्वाच्या बातम्या