(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नोवाक ज्योकोविच यूएस ओपनमधून बाहेर, रागाने टोलवलेला चेंडू लाईन जजला लागल्याने अपात्र
जगातील अव्वल टेनिसपटू नोवाक ज्योकोविच यूएस ओपनमधून बाहेर पडला आहे. रागात टोलवलेला चेंडू लाईन जजला लागल्याने त्याला अपात्र ठरवण्यात आलं आहे. नोवाक ज्योकोविच हा ग्रॅण्ड स्लॅमच्या इतिहासात अपात्र ठरलेला तिसरा टेनिसपटू ठरला आहे.
न्यूयॉर्क : जगातील अव्वल टेनिसपटू नोवाक ज्योकोविच यूएस ओपनच्या प्री क्वॉर्टर फायनलमधून बाहेर पडला. निराश झालेल्या ज्योकोविचनने मागे टोलवलेला चेंडू लाईन जजला लागल्याने त्याला स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं. यानंतर त्याने घडलेल्या प्रकाराबद्दल इन्स्टाग्रामवर खेद व्यक्त केला. ही घटना अतिशय दु:खद आणि चुकीची असल्याचं त्याने म्हटलं.
सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोवाक ज्योकोविचबाबत अमेरिन टेनिस संघाने (यूएसटीए) परिपत्रक जारी करुन या वृत्ताला दुजोरा दिला. ग्रॅण्ड स्लॅममध्ये नियम आहे की, "कोणताही खेळाडूने एखाद्या अधिकारी किंवा प्रेक्षकाला जखमी केलं तर त्याच्यावर दंड ठोठावून त्याला अपात्र ठरवलं जातं." सामनाधिकाऱ्यांनी नोवाक ज्योकोविचला या प्रकारासाठी दोषी ठरवलं आहे. नियमानुसार, यूएस ओपनच्या प्री-क्वार्टर सामन्यापर्यंत पोहोचण्यासाठी ज्योकोविचला जी रक्कम मिळेल, त्यावर दंड म्हणून कपात केली जाईल. तसंच या चुकीसाठी त्याचे रँकिंग पॉईंट्सी कमी केले जातील.
नोवाक ज्योकोविच हा जगातील अव्वल टेनिसपटू आहे, परंतु त्याने मारलेला चेंडू लाईन जजला लागल्याने तो स्पर्धेतून बाहेर पडला आहे. ज्योकोविच हा विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार समजला जा होता, परंतु तो आता स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
यूएस ओपनचा प्री-क्वॉर्टर सामना नोवाक ज्योकोविच आणि स्पेनच्या पाबलो कॅरेनो बुस्टा यांच्यात सुरु होता. या सामन्याच्या पहिल्या सेटमध्ये ज्योकोविच 5-6 ने मागे होता. ओपनिंग सेट मिळवण्यात अपयश आल्याने आणि सर्व्हिस ड्रॉप झाल्याने ज्योकोविच निराश झाला होता. याच नैराश्येत आणि रागाने त्याने चेंडू मागे टोलवला. हा चेंडू लाईन जजला लागल्याने तिच्या गळ्याला दुखापत झाली. तिला श्वास घेण्यास अडचण निर्माण झाली. यानंतर ज्योकोविच तिची विचारपूस करण्यासाठी तिच्याजवळ गेला आणि माफीही मागितली. मात्र काही वेळाने ही लाईन जज उठून टेनिस कोर्टाबाहेर गेली. यानंतर सामानाधिकाऱ्यांनी आपसात चर्चा केल्यानंतर ज्योकोविचला अपात्र ठरवलं. परिणामी ज्योकोविच यूएस ओपनमधून बाहेर पडला आहे.
Top-seeded Novak Djokovic was defaulted from his fourth-round match at the #USOpen after he accidentally hit a line judge with a tennis ball Sunday. pic.twitter.com/TTstxZB2Jw
— ESPN (@espn) September 6, 2020
दरम्यान स्पेनचा पाब्लो कार्रेनो बुस्टा क्वॉर्टर फायनलमध्ये पोहोचला आहे. तर रॉजर फेडरर आणि राफेल नदालने याआधीच यूएस ओपनमधून माघार घेतली आहे. आता ज्योकोविचही स्पर्धेतून बाद झाल्याने यंदा यूएस ओपनला नवा चॅम्पियन मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ग्रॅण्ड स्लॅममध्ये अपात्र ठरणारा ज्योकोविच हा तिसरा टेनिसपटू ग्रॅण्ड स्लॅमच्या इतिहासात अपात्र होणारा नोवाक ज्योकोविच हा तिसरा टेनिसपटू आहे. ज्योकोविचच्या आधी 1990 मध्ये जॉन मॅकेन्रो ऑस्ट्रेलियन ओपनमधून तर 2000 मध्ये स्टीफन कुबॅक फ्रेन्च ओपनमधून बाहेर पडले होते.