Unmukt Chand : भारताला अंडर 19 विश्वचषक जिंकून देणाऱ्या उन्मुक्त चंदची निवृत्ती, आता 'या' देशासाठी खेळणार!
Unmukt Chand : 28 वर्षीय क्रिकेटपटू फलंदाज उन्मुक्त चंद याने निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. उन्मुक्तनं भारताला 19 वर्षाखालील विश्वचषक जिंकून दिला होता.
Unmukt Chand : 28 वर्षीय क्रिकेटपटू फलंदाज उन्मुक्त चंद याने निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. उन्मुक्तनं भारताला 19 वर्षाखालील विश्वचषक जिंकून दिला होता. विशेष म्हणजे तो 2012 साली झालेल्या 19 वर्षाखालील विश्वचषक संघाचा कर्णधार होता आणि अंतिम सामन्यात 111 धावांची नाबाद खेळी केली होती. आता तो अमेरिकेकडून क्रिकेट खेळणार आहे. त्यानं ट्वीट करत आपल्या निवृत्तीबाबत घोषणा केली आहे. त्यानं एका ट्विटमध्ये 'रुक जाना नहीं कभी तू हार के...' या गाण्यासह भारतीय संघातील आणि आयपीएलमधील आठवणींचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.
त्यानं म्हटलं आहे की, क्रिकेट हा एक सार्वत्रिक खेळ आहे. त्याचा अर्थ बदलू शकता परंतु तुमचे ध्येय एकच असू शकते, ते म्हणजे सर्वोत्कृष्ट खेळ करून दाखवणं. मला मोलाची साथ देणाऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो. तुमच्यासारखी माणसं माझ्याकडे आहेत याबद्दल मी स्वत:ला नशीबवान समजतो. आता पुढील वाटचाल करायची आहे, असं उन्मुक्त चंदनं म्हटलं आहे.
T1- On to the next innings of my life #JaiHind🇮🇳 pic.twitter.com/fEEJ9xOdlt
— Unmukt Chand (@UnmuktChand9) August 13, 2021
उन्मुक्त डोमेस्टिक क्रिकेटमध्ये दिल्ली आणि उत्तराखंड या संघांकडून देखील खेळला असून त्याचं प्रदर्शन चांगलं राहिलं आहे. आयपीएलमध्ये तो मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्सकडून खेळला आहे. मात्र त्याला तिथं म्हणावं असं यश मिळालं नाही. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 120 सामन्यात दमदार फलंदाजी करत उन्मुक्तने 41.33 च्या सरासरीने 4505 धावा केल्या आहेत. यात सात शतक आणि 32 अर्धशतकांचा समावेश आहे. 2012 अंडर -19 विश्वचषक जिंकल्यानंतर तो चांगलाच चर्चेत आला होता. त्याने विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 111 धावांची नाबाद खेळी केली करत भारताला विश्वचषक जिंकून दिला होता.
उन्मुक्त चंदच्या आधी स्मित पटेलनेही दुसऱ्या देशासाठी खेळण्याचा निर्णय घेतला आहे. तो देखील 2012 अंडर -19 विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा तो सदस्य होता. स्मित पटेलने मे महिन्यात भारत सोडण्याचा निर्णय घेतला होता.