Maharashtra Kesari 2020 : कोण होणार यंदाचा महाराष्ट्र केसरी?
लातूरचा शैलेश शेळके आणि नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरनं यंदाच्या महाराष्ट्र केसरीच्या किताबासाठी आपली दावेदारी सिद्ध केली आहे. माती विभागाच्या फायनलमध्ये शैलेश शेळकेनं चुरशीच्या लढतीत कोल्हापूरच्या माऊली जमदाडेचा पराभव केला. तर मॅट विभागात हर्षवर्धन सदगीरनं पुणे शहरच्या अभिजीत कटकेवर सनसनाटी विजय नोंदवून किताबासाठीची फायनल गाठली आहे.
पुणे : महाराष्ट्र केसरी कुस्तीच्या आखाड्यात यंदा महाराष्ट्राला नवा विजेता मिळणार आहे. लातूरचा शैलेश शेळके आणि नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरनं यंदाच्या महाराष्ट्र केसरीच्या किताबासाठी आपली दावेदारी सिद्ध केली आहे. माती विभागाच्या फायनलमध्ये शैलेश शेळकेनं चुरशीच्या लढतीत कोल्हापूरच्या माऊली जमदाडेचा पराभव केला. तर मॅट विभागात हर्षवर्धन सदगीरनं पुणे शहरच्या अभिजीत कटकेवर सनसनाटी विजय नोंदवून किताबासाठीची फायनल गाठली आहे.
विशेष म्हणजे शैलेश शेळके आणि हर्षवर्धन सदगीर हे दोघंही पुण्याच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाचे पैलवान आणि अर्जुनवीर काका पवारांचे पठ्ठे आहेत. त्यामुळे आपापल्या विभागातली अंतिम फेरी जिंकल्यावर हर्षवर्धवन आणि शैलेश दोघांनीही काका पवार यांना खांद्यावर उचलून घेत आखाड्यात फेरी मारली. आता काका पवारांचे दोन शिष्य उद्या (07 जानेवारी) पुण्याच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात भिडतील आणि या स्पर्धेनंतर राज्याला नवा महाराष्ट्र केसरी मिळेल.
आज महाराष्ट्र केसरीच्या आखाड्यात दोन धक्कादायक निकाल पाहायला मिळाले. माती विभागाच्या उपांत्य फेरीत सोलापूरच्या माऊली जमदाडेनं पहिल्या धक्कादायक निकालाची नोंद केली आहे. माऊलीने महाराष्ट्र केसरीचा गतविजेता बाला रफिक शेख याला चितपट करुन माती विभागाची अंतिम फेरी गाठली. माती विभागाच्या फायनलमध्ये शैलेश शेळकेनं चुरशीच्या लढतीत माऊली जमदाडेचा पराभव केला. जमदाडेला माती विभागाच्या उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं आहे.
उपांत्य सामन्यात गतविजेता बाला रफिक शेख पहिल्या मिनिटाला 2-0 असा आघाडीवर होता. पण दुसऱ्याच मिनिटाला माऊलीने हप्ते डावावर बाला रफिकला चितपट करत यंदाच्या स्पर्धेतला धक्कादायक निकाल नोंदवला. बालाला चितपट करणारा माऊली जमदाडे हा मूळचा सोलापूरचा असून तो कोल्हापूरच्या गंगावेश तालमीत सराव करतो.
महाराष्ट्र केसरीच्या आखाड्यात अजून एक धक्कादायक निकाल पाहायला मिळाला. बाला रफिक शेखपाठोपाठ गतउपविजेता आणि 2018 च्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता अभिजीत कटकेचंसुद्धा महाराष्ट्र केसरीमधलं आव्हान संपुष्टात आलं आहे. मॅट विभागाच्या अंतिम फेरीत अभिजीतला नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरकडून धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला आहे. सलग चौथ्यांदा महाराष्ट्र केसरी किताबासाठी लढण्याच्या इराद्यानं मॅटवर उतरलेल्या अभिजीतला हर्षवर्धनने 5-2 अशा फरकानं हरवून सनसनाटी विजयाची नोंद केली आहे.
हर्षवर्धन सदगीर हा या स्पर्धेत नाशिककडून खेळतो पण तो अर्जुनवीर काका पवारांचा चेला असून पुण्याच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संरकुलात सराव करतो. दरम्यान या दोन धक्कादायक निकालांमुळे यंदा महाराष्ट्र केसरीच्या आखाड्यात नवा पैलवान मानाची चांदीची गदा उंचावणार आहे.