Video | सराव सामन्यादरम्यान स्लेजिंग, श्रीसंत पुन्हा वादाच्या भोवऱ्यात
खऱ्या अर्थानं श्रीसंत त्याच्या या दुसऱ्या इनिंगची सुरुवात करत आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. पण, सध्या एक असा व्हिडीओ समोर येत आहे ज्यामध्ये....
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघात एकेकाळी बराच चर्चेत असणारा गोलंदाज सध्या एक नवी सुरुवात करु पाहत आहे. सय्यद मुश्ताक अली टी20 स्पर्धेसाठी त्याची निवड केरळच्या संघात करण्यात आली आहे. श्रीसंतवर स्पॉट फिक्सिंगच्या आरोपांमुळं क्रिकेटवरील आजीवन बंदीची कारवाई करण्यात आली होती. पण, त्यानंतर उच्च आणि सर्वोच्च न्यायालयानं श्रीसंतवरील बंदी उठवण्याचे आदेश बीसीसीआयला दिले.
2020मधील सप्टेंबर महिन्यात त्याच्यावर असणारी ही बंदी उठली. त्यामुळं खऱ्या अर्थानं श्रीसंत त्याच्या या दुसऱ्या इनिंगची सुरुवात करत आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. पण, सध्या एक असा व्हिडीओ समोर येत आहे ज्यामध्ये श्रीसंतचा संताप अनावर झाल्याचं आणि याच संतापाच्या आहारी जात समोर असणाऱ्या खेळाडूला तो स्लेजिंग करताना दिसत आहे. त्यामुळं हा क्रिकेटपटू पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकल्याच्या चर्चा आहेत.
IND VS AUS: 'हिटमॅन' येताच टीम इंडियाकडून खास स्वागत, पाहा व्हिडीओ
क्रिकेटच्या मैदानात आक्रमकतेनं गोलंदाजी करणारा श्रीसंत हा अनेकदा त्याच्या विक्षिप्त स्वभावामुळंही चर्चेत असतो. इथं त्याचीच प्रचिती येत आहे. जिथं श्रीसंत सराव सामन्यादरम्यान एका खेळाडूला सातत्यानं रागे भरताना आणि त्याला स्लेजिंग अर्थात त्याच्याप्रती काही आक्षेपार्ह शब्दांचा वापर करताना दिसत आहे.
श्रीसंतचा हा व्हिडिओ आणि त्यामध्ये त्याचा न बललेला स्वभाव पाहता चाहत्यांनीही काहीशी निराशाजनक प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, श्रीसंतच्या या संघात रॉबिन उत्थप्पा आणि थंपी या खेळाडूंचाही समावेश आहे. मुश्कात अली टी20 सामन्यांसाठी केरळच्या संघाचा समावेश E गटात करण्यात आला आहे. या गटात मुंबई, पुदुच्चेरी, दिल्ली, हरयाणा, आंध्र प्रदेशचेही संघ आहेत. दरम्यान, केरळचा पहिला सामना 11 जानेवारीला पुदुच्चेरीविरोधात खेळला जाणार आहे. त्यामुळं प्लेइंग इलेव्हनमध्ये श्रीसंतला स्थान मिळाल्यास तो तब्बल 8 वर्षांनंतर खेळपट्टीवर दिसणार आहे. तेव्हा आता त्याच्या बाबतीत काय निर्णय होतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.