फायनलपूर्वी टीम इंडिया टेन्शनमध्ये, विराट कोहलीची प्रकृती बिघडली
लंडन: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महामुकाबला अर्थात चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल काही तासांवर येऊन ठेपली आहे. मात्र भारतीयांची धाकधूक वाढवणारी बातमी टीम इंडियाच्या गोटातून आली आहे.
भारताचा कर्णधार विराट कोहलीची प्रकृतीची बिघडली आहे. कोहलीला डोकेदुखीचा त्रास जाणवत असून, त्याला औषधं घ्यावी लागत आहेत.
विराटने संघाच्या फिजिओंकडून डोकेदुखीचं औषधं घेतली. ही औषधं घेऊन तो बर्मिंघहमच्या हॉटेलमधून लंडनकडे बसमधून रवाना झाला. ही दृश्यं एबीपी माझाच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.
या दृश्यांमध्ये विराट औषधे घेऊन बाहेर जाताना दिसतो. त्यावेळी विराटने डोक्याला हात लावला होता.
यावरुन विराटची ही डोकेदुखी किती तीव्रतेची असेल, याचा अंदाज लावता येईल.
भारत - पाकिस्तान महामुकाबला
चॅम्पियन्स ट्रॉफीत भारत विरुद्ध पाकिस्तान अशी ड्रीम फायनल येत्या रविवारी ओव्हल मैदानावर खेळवण्यात येणार आहे.
विराट कोहलीच्या टीम इंडियानं बर्मिंगहॅमच्या उपांत्य सामन्यात बांगलादेशचा नऊ विकेट्सनी धुव्वा उडवून फायनलमध्ये धडक मारली. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशला 50 षटकांत सात बाद 264 धावांत रोखून टीम इंडियाची निम्मी मोहीम फत्ते केली होती.
मग रोहित शर्माच्या नाबाद शतकानं भारताचा विजय आणखी सोपा केला. रोहितनं शिखर धवनच्या साथीनं 87 धावांची दमदार सलामी दिली. मग त्यानं आणि विराट कोहलीनं दुसऱ्या विकेटसाठी 178 धावांची अभेद्य भागीदारी रचून टीम इंडियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. रोहितनं 129 चेंडूंत 15 चौकार आणि एका षटकारासह नाबाद 129 धावांची खेळी उभारली.
विराटनं 78 चेंडूंमधल्या नाबाद 96 धावांच्या खेळीला तेरा चौकारांचा साज चढवला. त्याआधी शिखर धवननं 34 चेंडूंत सात चौकार आणि एका षटकारासह 46 धावांची खेळी केली. भारताकडून भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमरा आणि केदार जाधवनं प्रत्येकी दोन फलंदाजांना माघारी धाडलं.