टीम इंडियाने टी-20 विश्वचषकावर नाव कोरलं, नरेंद्र मोदींकडून खास शुभेच्छा, म्हणाले....
Ind Vs SA : भारताने दक्षिण आफ्रिकेला सात धावांनी पराभूत करत टी- 20 विश्वचषकावर आपलं नाव कोरलं आहे. या विजयानंतर देशभरातून टीम इंडियाचे अभिनंदन केले जात आहे.
India Vs South Africa Final Match : भारतीय संघाने टी-20 विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेला सात धावांनी पराभूत केले आहे. भारताच्या या विजायाचा देशभरात जल्लोष करण्यात येत आहे. देशाच्या सर्वच भागांत आतषबाजी करून टीम इंडियाच्या कामगिरीचे स्वागत केले जात आहे. दरम्यान, भारतीय संघाच्या या नेत्रदीपक कामगिरीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील अभिनंदन केले आहे. त्यांनी टीम इंडियाच्या अभिनंदनासाठी एक्स या सोशल मीडिया माध्यमावर शुभेच्छा संदेश देणारा खास संदेश प्रसिद्ध केला आहे.
नरेंद्र मोदी काय म्हणाले?
टीम इंडियाचे संपूर्ण नागरिकांकडून खूप खूप शुभेच्छा. आज 140 कोटी नागरिकांना तुमच्या या शानदार कामगिरीमुळे गर्व वाटत आहे. तुम्ही विश्वचषक जिंकला. पण आज तुम्ही देशातील प्रत्येक गल्लीत लोकांचे मन जिंकले आहे. हा टी-20 विश्वचषक एका वेगळ्या कारणामुळे स्मरणात राहील. एवढे सारे देश, एवढ्या साऱ्या टीम होत्या. पण भारताचा एकाही सामन्यात पराभव झालेला नाही. क्रिकेट जगतातील दिग्गज टीमचा तुम्ही सामना केला. तुम्ही शानदार विजय प्राप्त केला आहे. या सलग विजयांमुळे हा विश्वचषक रोमांचक झाला होता, असे नरेंद्र मोदी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणाले.
CHAMPIONS!
— Narendra Modi (@narendramodi) June 29, 2024
Our team brings the T20 World Cup home in STYLE!
We are proud of the Indian Cricket Team.
This match was HISTORIC. 🇮🇳 🏏 🏆 pic.twitter.com/HhaKGwwEDt
दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 177 धावांचे लक्ष्य
नाणेफेक जिंकून टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण भारताची सुरवात चांगली झाली नाही. कर्णधार आणि सलामीवर रोहित शर्मा फक्त 9 धावा करू शकला. विराट कोहलीने मात्र एकट्याने टीम इंडियाला सांभाळले. त्याने 59 चेंडूंमध्ये 6 चौकार, 2 षटकार यांच्या मदतीने 76 धावा केल्या. दुसरीकडे ऋषभ पंतला खातंदेखील खोलता आलं नाही. सूर्यकुमार यादवही अवघ्या तीन धावा करून बाद झाला. अक्षर पटेलने मात्र विराट कोहलीला साथ देत चार षटकार आणि एक चौकार यांच्या मदतीने 31 चेंडूंत 47 धावा केल्या. शिवम दुबेनेही 16 चेंडूंमध्ये 47 धावा केल्या. हार्दिक पांड्याने पाच तर रविंद्र जडेजाने दोन धावा केल्या. भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 177 धावांचे लक्ष्य ठेवले.
दक्षिण आफ्रिकेने केल्या 169 धावा
दक्षिण आफ्रिकेने मात्र ही धावसंख्या गाठण्यासाठी सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी केली. त्यांचा रझा हेन्ड्रिक्स हा सलामीवीर फारशी चमक दाखवू शकला नाही. त्याने फक्त चार धावा केल्या. क्विंटन डी कॉकने मात्र 31 धावा करत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. कर्णधार ऐडन मर्कर यालाही फक्त चार धावा करता आल्या. ट्रिस्टॅन स्टब्सने 21 चेंडूत 31 धावा केल्या. हेनरिच क्लासनेने मात्र 52 धावांची खेळी करत भारताला आडचणीत आणले होते. त्याने ही धावसंख्या अवघ्या 27 चेंडूमध्ये केली. पण त्याला हार्दिक पांड्याने झेलबाद केले. डेव्हिड मिलरही हार्दिक पांड्याच्या चेंडूवर 21 धावांवर झेलबाद झाला. मार्को जानसेने फक्त दोन धावा करू शकला. केशव महाराज (2), कसिगो रबाडा (4) हे तिन्ही खेळाडू खास कामगिरी करू शकले नाहीत.