IPL 2020 संपलं तरी 'या' खेळाडूची चर्चा; हजभजन सिंह म्हणतो हा भारताचा एबी डिविलियर्स
आयपीएलचा पहिला सीजन नाही ज्यात सूर्यकुमार यादवने आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. त्याने 2018 आणि 2019 हंगामात त्याने 512 आणि 424 धावा केल्या होत्या.
IPL 2020 : मुंबई इंडियन्सने आयपीएल 2020 च्या विजेतेपदावर नाव कोरलं आणि पाचव्यांदा आयपीएलचा चषक उंचावला. आयपीएल 2020 संपल्यानंतर एका खेळाडूची जोरदार चर्चा होती, तो खेळाडू म्हणजे मुंबई इंडियन्सचा फलंदाज सूर्यकुमार यादव. मधल्या फळीत या खेळाडून चमकदार कामगिरी करत 16 सामन्यात 40.00 च्या सरासरीने 480 धावा केल्या. या हंगामात त्याचा स्ट्राइक रेट 145.01 होता. विविध प्रसंगी तो मुंबईचा मॅच विनर ठरला. सूर्यकुमार यादवने आपल्या फलंजाजीने सर्वांना प्रभावित केले.
ऑस्ट्रेलियाच्या भारतीय संघाची घोषणा झाली मात्र त्यात सूर्यकुमार यादवच्या नावाचा समावेश नव्हता. याबद्दल क्रिकेटप्रेमी आणि तज्ज्ञांनी आश्चर्य व्यक्त केलं. दरम्यान, भारताचा ऑफस्पिनर हरभजन सिंगने सूर्यकुमार यादव यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. हरभजनने सूर्यकुमार यादवची तुलना भारताचा एबी डिव्हिलियर्स अशी केली आहे.
स्टार स्पोर्ट्सवर बोलताना हरभजनने सूर्यकुमार यादवचे कौतुक केले. तो म्हणाला की, सूर्यकुमार यादवने मुंबई इंडियन्सकडून गेम चेंजर ते प्रायमरी मॅच विनर म्हणून स्वतःचे रूपांतर केले यात शंका नाही. त्याने फलंदाजीची बरीच जबाबदारी घेतली होती. असे नाही की तो 100 च्या स्ट्राइक रेटवर खेळतो. तो आक्रमक फलंदाजी करत पाहिल्याच चेंडूपासून फटकेबाजी करण्यात सक्षम आहे.
हरभजन सिंग पुढे म्हणाला की, सूर्यकुमार यादव एक अविश्वसनीय खेळाडू आहे. हा आयपीएलचा पहिला सीजन नाही ज्यात सूर्यकुमार यादवने आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. त्याने 2018 आणि 2019 हंगामात त्याने 512 आणि 424 धावा केल्या होत्या.
सूर्यकुमार यादवला रोखणे गोलंदाजांसमोर आव्हान असतं, कारण त्याच्याकडे सर्व प्रकारचे शॉट्स आहेत. तो कव्हर शॉट चांगला खेळू शकतो, स्वीप व्यवस्थित खेळू शकतो, स्पिनर्सलाही चांगला खेळू शकतो. तसेच वेगवान गोलंदाजांविरोधातही उत्तम खेळतो. तो भारताचा एबी डिव्हिलियर्स आहे. मला वाटते की ऑस्ट्रेलिया दौर्यासाठी त्याची भारतीय संघात निवड व्हायला हवी होती, मात्र तसं झालं नाही. मात्र लवकरच तो टीम इंडियामध्ये दिसेल, असा विश्वास हरभजन सिंहने व्यक्त केला.