SRH Vs CSK | चेन्नई सुपर किंग्सकडून पराभवाचा वचपा, परतीच्या सामन्यात हैदराबादवर 20 धावांनी मात
चेन्नईच्या प्रभावी माऱ्यासमोर हैदराबादला 8 बाद 147 धावांचीच मजल मारता आली. केन विल्यमसनची 57 धावा करुन एकाकी झुंज दिली.
SRH Vs CSK IPL 2020 : चेन्नई सुपर किंग्सनं परतीच्या सामन्यात हैदराबादवर २० धावांनी मात करुन पहिल्या सामन्यातल्या पराभवाचा वचपा काढला. चेन्नईचा यंदाच्या हंगामातील हा तिसरा विजय ठरला. या सामन्यात चेन्नईनं हैदराबादला विजयासाठी 168 धावांचं मोठं आव्हान दिलं होतं. पण चेन्नईच्या प्रभावी माऱ्यासमोर हैदराबादला 8 बाद 147 धावांचीच मजल मारता आली. केन विल्यमसनची 57 धावा करुन एकाकी झुंज दिली. तर चेन्नईच्या कर्ण शर्मा, ड्वेन ब्राव्होनं प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
त्याआधी चेन्नईनं 20 षटकात 7 बाद 167 धावांची मजल मारली होती. सलामीचा फाफ ड्यू प्लेसिस शून्यावर माघारी परतल्यानंतर शेन वॅटसननं सॅम करन आणि अंबाती रायुडूच्या साथीनं चेन्नईच्या डावाला आकार दिला. वॅटसननं 42 धावांची खेळी केली. करननं 31 तर रायुडूनं 41 धावांचं योगदान दिलं. हैदराबादकडून नटराजन, खलील अहमद आणि संदीप शर्मानं प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या.
168 धावांचा पाठलाग करताना हैदराबादचे फलंदाज झटपट बाद झाले. केन विल्यमसनने मात्र एकाकी झुंज दिली, पण त्याला इतर कोणत्याही फलंदाजाची साथ मिळून शकली नाही. विल्यमसनने 7 चौकारांसह 39 बॉलमध्ये 57 धावा केल्या. पण त्याचा फारसा परिणाम झाला नाही.
टॉस जिंकून महेंद्रसिंग धोनीने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. स्पर्धेत पहिल्यांदा चेन्नईला फलंदाजीची संधी मिळाली. शेन वॉटसन, धोनी, अंबाती रायुडू आणि रवींद्र जडेजा यांनी मोठे योगदान दिले. वॉटसनने 38 बॉलमध्ये 1 चौकार व 3 षटकारांसह 42 धावा केल्या. तर धोनीने 2 चौकार आणि 1 षटकार खेचत 12 बॉलमध्ये 21 धावा करून माघारी परतला. रवींद्र जडेजानं 10 बॉलमध्ये 25 धावा करताना चेन्नईला 6 बाद 167 धावांची मजल मारुन दिली.