आनंद गुरुजींची शिकवणी... कोणत्याही क्षेत्रात 'चॅम्पियन' बनण्यासाठी!
"वाळवंटात गवसलेला पाण्याचा स्त्रोत असं मी या विश्वविजेतेपदाचं वर्णन करीन. तुमच्या कारकीर्दीत यश मिळणं हे कधीही महत्वाचं असतं. तुम्ही कठीण काळावर प्रयत्नपूर्वक मात करु शकता पण नव्यानं उभारी घेण्यासाठी यश मिळणं आवश्यक असतं."

भारताचा विश्वनाथन आनंद पुन्हा एकदा रॅपिड बुद्धिबळाच्या विश्वाचा राजा झाला आहे. रियाधमध्ये नुकत्याच झालेल्या जागतिक रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत आनंदनं विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. त्याच निमित्तानं विश्वनाथन आनंदशी बोलून, तो कसा विचार करतो... तो वयाच्या ४८व्या वर्षी स्वत:ला कसा प्रेरित करतो... उदयोन्मुख खेळाडूंनी चॅम्पियन बनण्यासाठी काय करायला हवं... हे जाणून घेतलं आहे एबीपी माझानं. पण आनंद गुरुजींची ही शिकवणी अंगी बाणलीत तर तुम्ही कोणत्याही क्षेत्रात चॅम्पियन बनू शकता.
प्रश्न - आनंद तू पारंपारिक बुद्धिबळाचा अनेक वर्षे विश्वविजेता होतास… तू रॅपिड बुद्धिबळाचंही विश्वविजेतेपद याआधी पटकावलं आहेस… मग रॅपिड बुद्धिबळाचं यंदाच्या विश्वविजेतेपदाचं तुझ्या दृष्टीनं मोल किती मोठं आहे…
उत्तर - वाळवंटात गवसलेला पाण्याचा स्त्रोत असं मी या विश्वविजेतेपदाचं वर्णन करीन. तुमच्या कारकीर्दीत यश मिळणं हे कधीही महत्वाचं असतं. तुम्ही कठीण काळावर प्रयत्नपूर्वक मात करु शकता पण नव्यानं उभारी घेण्यासाठी यश मिळणं आवश्यक असतं. माझ्यासाठी या विजेतेपदाचं भावनिक मोल अधिक आहे. कारण मी पुन्हा एकदा रॅपिड बुद्धिबळाचा विश्वविजेता बनलो आहे.
प्रश्न - आनंद 2013 आणि 2014 साली विश्वविजेतेपदाच्या लढतीत तुला मॅग्नस कार्लसनकडून हार स्वीकारावी लागली होती त्यानंतर सर्वोच्च स्तरावर खेळत राहण्यासाठी तू स्वतचं मनोबल कसं उंचावलंस…
उत्तर - मला एकदा सूर गवसला की, सातत्यानं चांगली कामगिरी बजावण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो. पण दुर्दैवानं कामगिरी चांगली झाली नाही तरीही त्यातून सावरून कमबॅक करण्यासाठी मी झटत असतो. अजूनही सर्वोच्च स्तरावर बुद्धिबळ खेळण्याची माझी भूक कायम आहे. मी कधीही मेहनत करण्याचं टाळत नाही. याही वयात नवनव्या गोष्टी शिकण्याची माझी तयारी असते. पण तुम्ही विचाराल की माझी कामगिरी चांगली का होते… कधी होते… तर तुमच्या या प्रश्नाला माझ्याकडे उत्तर नाही. कधीकधी मनासारखं घडून येतं. आणि ते खूप छान असतं.
प्रश्न - आनंद बुद्धिबळात वयाचा प्रश्न नसतो. तुला या वयातही मॅग्नस कार्लसनसारख्या प्रतिभावान खेळाडूशी लढावं लागतं. तू पारंपारिक विश्वविजेतेपदाच्या लढतीत त्याच्याशी दोनदा हरलास, पण आता रॅपिड बुद्धिबळात तू त्याला हरवलंस. या युवा प्रतिभावान खेळाडूंशी दोन हात करण्याची तू कशी तयारी करतोस आणि त्यासाठी तू वेगळा विचार करतोस का…
उत्तर - रॅपिड बुद्धिबळात तुम्हाला नक्कीच वेगळा विचार करावा लागतो. कारण रॅपिड बुद्धिबळात वेळेचं बंधन असतं. तुला प्रतिस्पर्ध्याच्या चाली झटपट समजून घ्यायच्या असतात. तुम्हाला वेगानं निर्णय घ्यायचे असतात… वगैरे वगैरे. हे बघ स्पष्टच सांगतो बुद्धिबळातही वयाचा फरक पडतो. ते मी नाकारणार नाही. पण आता त्याला मी काही करु शकणार नाही. त्यामुळं वयाचा सतत विचार करण्यापेक्षा मी बुद्धिबळाच्या नवनव्या खुबी शिकण्याचा प्रयत्न करतो. रॅपिड बुद्धिबळात मला त्याचा फायदाही झाला. पण मला वाटतं बुद्धिबळात टिकून रहायचं तर तुमचा दैनंदिन सराव कसा आहे ते महत्वाचं ठरतं. खेळाडूनं त्याचं योग्य नियोजन करणं आवश्यक आहे.
प्रश्न - आनंद तू उदयोन्मुख बुद्धिबळपटूंना कसं मार्गदर्शन करशील… कारण त्यांना एकाच वेळी अभ्यास आणि बुद्धिबळ अशी तारेवरची कसरत करावी लागते…
उत्तर - मी युवा खेळाडूंना सांगेन की अभ्यास आणि बुद्धिबळ यावर सारखंच लक्ष द्या. कारण अभ्यासात चांगले गुण मिळवण आवश्यक असतं. त्यामुऴं दोन्हीची योग्य सांगड घाला. बुद्धिबळासाठी अभ्यासाकडे दुर्लक्ष करु नका. दोन्हीपैकी एखादी गोष्ट स्वत:वर लादू नका. त्यातून तुम्हाला आनंद मिळतो आहे का ते पाहा. मला वाटतं शालेय वयात तुमच्या हाताशी भरपूर वेळ असतो. त्यामुळं तुम्ही दोन्हीवर भरपूर मेहनत घेऊ शकता. आणि मनापासून केलंत तर यश तुमच्यापासून दूर राहत नाही.
प्रश्न - आनंद तू एका वेगळ्या उंचीवर खेळतो आहेस, सर्वोच्च स्तरावर आहेस, त्यामुऴं बुद्धिबळातल्या संगणकाच्या वाढत्या वापराविषयी तू नवोदितांना काय मार्गदर्शन करशील…
उत्तर - मला असं वाटतं की प्रगती करायची तर बुद्धिबळाचं नवीन तंत्र आणि मंत्र आत्मसात करणं आवश्यक असतं. त्याच वेळी तुम्हाला जुळवून घेता येईल असं सरावाचं दैनंदिन वेळापत्रक तुम्ही आखायला हवं. त्याचं कटाक्षानं पालनही करायला हवं. एकमेकांशी बोलून आपापल्या खेळाच्या पद्धती समजून घ्या. पण त्याचं अनुकरण करु नका. सरावाची…खेळाची जी पद्धत तुम्हाला अनुकूल ठरते त्या पद्धतीवर अंमल करा. आणि कठोर मेहनतीला पर्याय नाही हे कायम लक्षात राहू द्या.
प्रश्न - आनंद, मानसिक कणखरतेचा खेळ अशी बुद्धिबळाची ओळख आहे. पण आज सगळ्याच खेळात मानसिक कणखरतेला महत्व आलं आहे. त्यामुळं बुद्धिबळ आणि इतरही खेळातल्या नवोदितांना तू मानसिक तयारीसाठी काय मार्गदर्शन करशील…
उत्तर - मला असं वाटतं की बुद्धिबळात तुम्ही शांत चित्तानं खेळणं सगळ्यात महत्त्वाचं असतं. त्यामुळं कोणत्याही सामन्याआधी तुमचं मन शांत आणि स्थिर कसं राहील यावर लक्ष केंद्रित करा. तुमच्या आजूबाजूला तसं वातावरण कसं तयार होईल याची दक्षता घ्यायला हवी.
प्रश्न - आनंद शेवटचा प्रश्न… बुद्धिबळाच्या निमित्तानं तू आज जगभर फिरत आहेस, उमेदीच्या काळात तू देशभर आणि महाराष्ट्रातही फिरला आहेस त्याच काळात बुद्धिबळामुळं तुझ सांगलीशी आणि दिवंगत भाऊसाहेब पडसळगीकरांशी एक भावनिक नातं तयार झालं होतं त्याविषयी काय सांगशील…
उत्तर - मी महाराष्ट्रात अनेक महत्वाच्या स्पर्धांमध्ये खेळलो आहे. ज्युनियर राष्ट्रीय बुद्धिबळ वगैरे वगैरे… भाऊसाहेब पडसळगीकर हे एक यजमान म्हणून आमची खूप काळजी घ्यायचे. त्यांना आम्हा छोट्या बुद्धिबळपटूंचा खूप लळा होता. कारण त्याचं बुद्धिबळावर मनापासून प्रेम होतं. त्यामुळं आमच्याशी वागण्यातही त्याचं ते प्रेम दिसून यायचं. मी त्यांना कधीच विसरु शकणार नाही. त्यांच्या उतारवयातही एकदा माझा खेळ पाहायला एकदा चेन्नईत आले होते. त्यामुळं मी भारावून गेलो होतो. आज ते हयात नाहीत याचं दु:ख होतं. पण आयुष्यात मी त्यांना कधीच विसरु शकत नाही.
प्रश्न - तुझ्यासाठी ते खास शिराही घेऊन यायचे…
उत्तर - हो हो… त्या शिऱ्याची चवही विसरता येणार नाही.























