एक्स्प्लोर
क्रिकेटवीर पद्माकर शिवलकरांना सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्कार
मुंबई : मुंबईचे ज्येष्ठ क्रिकेटवीर पद्माकर शिवलकर आणि हरियाणाचे राजिंदर गोयल या दोघा दिग्गज फिरकी गोलंदाजांना बीसीआयच्या सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्कारानं गौरवलं जाणार आहे. बंगळुरुमध्ये 8 मार्च रोजी बीसीसीआयच्या वार्षिक पुरस्कारांचं वितरण केलं जाणार असून, त्या सोहळ्यात शिवलकर आणि गोयल यांना सन्मानित केलं जाईल असं बीसीसीआयनं जाहीर केलं आहे.
शिवलकर आणि गोयल यांना भारताचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळू शकली नाही. पण देशांतर्गत क्रिकेटमध्ये या दोघा डावखुऱ्या फिरकी गोलंदाजांनी आपला ठसा उमटवला होता. शिवलकर यांनी 124 प्रथमश्रेणी सामन्यांत 589 विकेट्स काढल्या. त्यांनी तब्बल 42 वेळा डावात पाच विकेट्स काढण्याची तसंच 13 वेळा सामन्यात दहा विकेट्स काढण्याची कमाल केली होती.
राजिंदर गोयल यांच्या नावावर रणजी क्रिकेटमध्ये सर्वाधिक 637 विकेट्सचा विक्रम जमा आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये राजिंदर गोयल यांनी एकूण 750 विकेट्स काढल्या होत्या.
बीसीसीआयच्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यात यंदा पहिल्यांदाच महिला क्रिकेटमधील योगदानासाठीही जीवनगौरव पुरस्कार दिला जाणार आहे. भारताच्या माजी कर्णधार शांता रंगास्वामी यांना या पुरस्कारानं गौरवलं जाणार आहे.
ज्येष्ठ पत्रकार एन राम, क्रिकेट इतिहासकार रामचंद्र गुहा आणि भारताच्या माजी कर्णधार डायना एडलजी यांचा समावेश असलेल्या समितीनं जीवनगौरव पुरस्कारांची निवड केली आहे.
बंगळुरुत होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यात मुंबईचे माजी रणजीवीर दिवंगत रमाकांत देसाई आणि माजी कसोटीवीर वामन विश्वनाथ कुमार यांना विशेष पुरस्कारानं सन्मानित केलं जाईल.
या सोहळ्याआधी एमएके पतौडी स्मृती व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं असून, यंदा भारताचे माजी यष्टिरक्षक फारुख इंजिनियर यांना हे व्याख्यान देण्याचा मान मिळणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement