एक्स्प्लोर
कर्णधार अजिंक्य रहाणेला तब्बल 12 लाखांचा दंड
मुंबई इंडियन्स विरुद्धच्या कालच्या (रविवार) सामन्यात राजस्थान रॉयल्सनं षटकांची गती न राखल्याने कर्णधार अंजिक्य रहाणेला 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

मुंबई : राजस्थान रॉयल्सनं वानखेडेवरच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा सात विकेट्सनी धुव्वा उडवून, आयपीएलमधलं आपलं आव्हान कायम राखलं. पण या सामन्यानंतर कर्णाधर अजिंक्य रहाणेला मात्र कारवाईला सामोरं जावं लागलं आहे. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या कालच्या (रविवार) सामन्यात राजस्थान रॉयल्सनं षटकांची गती न राखल्याने कर्णधार अंजिक्य रहाणेला 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. 'राजस्थान रॉयल्सचा कर्णधार अजिंक्य रहाणे हा मुंबई इंडियन्स विरुद्ध 13 मे रोजी झालेल्या आयपीएल सामन्यात षटकांची गती राखू शकला नाही. हे आयपीएल आचारसंहितेचं उल्लंघन असल्याने कर्णधाराला 12 लाखाचा दंड ठोठावण्यात येत आहे.' असं आयपीएलनं आपल्या पत्रकात म्हटलं आहे. दरम्यान, राजस्थानकडून झालेल्या पराभवानं मुंबई इंडियन्सच्या आव्हानाला धोका निर्माण झाला आहे. राजस्थानच्या या विजयाचा जॉस बटलर प्रमुख शिल्पकार ठरला. त्यानं ५३ चेंडूंत नऊ चौकार आणि पाच षटकारांसह नाबाद ९४ धावांची खेळी उभारली. बटलरचं यंदाच्या मोसमातलं हे पाचवं अर्धशतक ठरलं. या सामन्यात मुंबईनं राजस्थानला विजयासाठी अवघं १६९ धावांचं आव्हान दिलं होतं. बटलरनं अजिंक्य रहाणेच्या साथीनं ९५ आणि संजू सॅमसनच्या साथीनं ६१ धावांची भागीदारी रचून राजस्थानला विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवलं. मग त्यानंच हार्दिक पंड्याला षटकार ठोकून राजस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
आणखी वाचा























