एक्स्प्लोर
धर्मशाला कसोटीतील विजयाचा शिल्पकार रवींद्र जाडेजा
मुंबई : एका जमान्यात केवळ ट्वेन्टी ट्वेन्टीत खेळू शकणारा क्रिकेटर म्हणून अनेकांनी रवींद्र जाडेजाला हिणवलं होतं. पण त्याच जाडेजानं अष्टपैलू खेळाडू म्हणून गेल्या काही महिन्यांत आपल्या कारकीर्दीला कलाटणी दिली आहे आणि भारताच्या विजयात वेळोवेळी मोलाची भूमिका बजावली आहे.
रवींद्र जाडेजानं आपल्या टीकाकारांना अगदी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. जाडेजाच्याच अष्टपैलू कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या धर्मशाला कसोटीत भारताच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला.
जाडेजानं त्या कसोटीच्या पहिल्या डावात 63 धावांची खेळी करुन भारताला ऑस्ट्रेलियावर 32 धावांची आघाडी मिळवून दिली. मग दुसऱ्या डावात तीन विकेट्स काढून त्यानं भारताच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. इतकंच नाही, तर जाडेजा मालिकेत सर्वाधिक 25 विकेट्ससह मालिकावीर पुरस्काराचाही मानकरी ठरला.
एक डावखुरा फिरकी गोलंदाज म्हणून जाडेजानं कसोटी क्रिकेटमध्ये आपला दरारा निर्माण केला आहे. आयसीसीच्या कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीतही तो अव्वल स्थानावर पोहोचला आहे.
जाडेजानं ऑगस्ट 2016 नंतर 14 कसोटी सामन्यांमध्ये तब्बल 74 विकेट्स काढल्या आहेत. रवींद्र जाडेजाची खासियत म्हणजे केवळ गोलंदाजीतच नाही, तर फलंदाजीतही त्यानं वेळोवेळी निर्णायक भूमिका बजावली आहे. जाडेजानं या मोसमात 578 धावा केल्या आहेत.
जाडेजानं जेव्हा जेव्हा अर्धशतकाची वेस ओलांडली, तेव्हातेव्हा भारताला विजयाची संधी मिळवून दिली. जाडेजानं गेल्या आठ कसोटींत 6 अर्धशतकं ठोकली असून त्यापैकी 5 कसोटी भारतानं जिंकल्या तर एक कसोटी अनिर्णित राहिली.
आक्रमक फटकेबाजी, वेगानं धावा करण्याची क्षमता आणि अर्धशतक ठोकल्यावर किंवा सामना जिंकल्यावर आपल्या खास स्टाईलमध्ये बॅट उपसून केलेलं सेलिब्रेशन ही जाडेजाची ओळख बनली आहे. कुठे शाब्दिक लढाईत उतरायचं आणि कुठे बॅटनंच उत्तर द्यायचं हे जाडेजाला ठाऊक आहे. धर्मशाला कसोटीत ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक मॅथ्यू वेडच्या शेरेबाजीला त्यानं असंच प्रत्युत्तर दिलं होतं.
खरं तर रवींद्र जाडेजा हा ट्वेन्टी२०च्या हायस्पीड जमान्यातला क्रिकेटर. 2008 साली विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली अंडर 19 विश्वचषक जिंकण्याऱ्या संघाचा जाडेजा सदस्य होता. त्याच वर्षी, आयपीएलच्या पहिल्या मोसमानं जाडेजाला प्रसिद्धी मिळवून दिली. जाडेजानं त्यावेळी राजस्थान रॉयल्सच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
अर्थात ट्वेन्टी२० क्रिकेटमध्ये केवळ चार षटकं गोलंदाजी आणि काही षटकं फटकेबाजी एखाद्या खेळाडूला रातोरात स्टार बनवून जाते. पण जाडेजानं तेवढ्यावरच समाधान न मानता आधी वन डेत आणि आता कसोटीतही आपला दबदबा निर्माण केला आहे. कसोटी क्रिकेटच्या मैदानातलं जाडेजाचं यश तर जाणकारांना थक्क करणारं ठरलं आहे.
रवींद्र जाडेजाच्या रुपानं भारताला कित्येक वर्षांनी एक परिपूर्ण अष्टपैलू मिळाला आहे. आता परदेशांतील कसोटींमध्येही जाडेजाकडून अशाच भरीव कामगिरीची अपेक्षा राहील.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement