पहिल्याच कसोटी मालिकेनंतर पृथ्वी शॉची रँकिंगमध्ये मोठी झेप
रिषभ पंतनेही जागतिक रँकिंगमध्ये जागा मिळवली आहे. तर गोलंदाज उमेश यादवला 4 स्थानांचा फायदा झाला.
पृथ्वी शॉने पहिल्याच कसोटी मालिकेनंतर टेस्ट रँकिंगमध्ये 465 अंकांसह 60व्या स्थानी जागा मिळवली आहे. पहिल्या कसोटीत 134 धावांची खेळी आणि दुसऱ्या कसोटीत 70 आणि 33 धावांची खेळी पृथ्वीला रॅंकिंग सुधारण्यासाठी उपयुक्त ठरली. पहिल्या कसोटी शतक ठोकल्यानंतर त्याने जागतिक क्रमवारीत 73वं स्थान पटकावलं होतं.
युवा विकेटकीपर, फलंदाज रिषभ पंतनेही जागतिक रँकिंगमध्ये जागा मिळवली आहे. वेस्ट इंडिजविरोधात राजकोट कसोटीत पहिल्या डावात 92 आणि हैदराबाद कसोटीत पहिल्या डावात 92 धावांच्या खेळीचा रिषभला फायदा झाला. रिषभने आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये 85व्या स्थानावरून 62व्या स्थानावर उडी घेतली आहे. रिषभचे एकूण 459 अंक आहेत.
दुसऱ्या कसोटीतील स्टार गोलंदाज उमेश यादवला 4 स्थानांचा फायदा झाला. उमेश यादव आयसीसी रँकिंगमध्ये 613 अंकांसह 25 व्या क्रमांकवर पोहोचला आहे. हैदराबाद कसोटीत उमेशने 10 विकेट घेतल्या होत्या.
कर्णधार विराट कोहलीनेही आपलं कसोटीतील अव्वल स्थान कायम ठेवलं आहे. विराट आपल्या कारकिर्दितील सर्वोत्कृष्ट 935 अंकासह टेस्ट रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर आहे.
वेस्ट इंडिज खेळाडूंच्या रँकिंगमध्येही सुधारणा झाली आहे. वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डर 766 अंकांसह 13 व्या स्थानावरून 9 व्या स्थानावर पोहोचला आहे. तर फलंदाज रोस्टन 41व्या स्थानावरून 31व्या स्थानावर पोहोचला आहे.