Prithvi Shaw Records: जबरदस्त... पृथ्वी शॉनं एकाच षटकात ठोकले सहा चौकार, वेगवान अर्धशतकाचाही विक्रम
सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉने तर कोलकाताविरोधात नवं रेकॉर्ड केलं आहे. पृथ्वीनं शिवम मावीच्या पहिल्याच षटकाच सलग 6 चौकार ठोकण्याचा विक्रम केला आहे. सोबतच यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक करण्याचा देखील विक्रम केला.
IPL 2021 | गेल्या सामन्यात चेन्नईविरोधात एका धावेने पराभव झाल्यानंतर दिल्लीचा संघ आज आक्रमक होऊन मैदानात उतरला आहे. सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉने तर कोलकाताविरोधात नवं रेकॉर्ड केलं आहे. पृथ्वीनं शिवम मावीच्या पहिल्याच षटकाच सलग 6 चौकार ठोकण्याचा विक्रम केला आहे. सोबतच यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक करण्याचा देखील विक्रम केला. त्यानं केवळ 18 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे. तो अजूनही मैदानात खेळत असून आतापर्यंत त्यानं 10 चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीनं नाबाद 50 धावा केल्या आहेत. पृथ्वीने केलेल्या कारनाम्यामुळं पहिल्या षटकात दिल्लीने 25 धावा वसूल केल्या. पृथ्वीच्या सोबतीला शिखर धवननं देखील आपला फार्म कायम ठेवत चांगली खेळी केली आहे. तो सध्या 35 चेंडूत 30 धावा करत मैदानावर आहे. दिल्लीची धावसंख्या 10 षटकानंतर बिनबाद 95 झाली आहे.
तत्पूर्वी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरु असलेल्या सामन्यात कोलकाताने दिल्ली समोर 155 धावांचं लक्ष्य ठेवलं. शुभमन गिल आणि आंद्रे रसेलच्या स्फोटक फलंदाजीमुळे कोलकाताने 154 धावांपर्यंत मजल मारली. कोलकाताकडूनआंद्रे रसेलने 45 धावा आणि शुभमन गिलने 43 धावा केल्या. कोलकाताकडून डावाची सुरुवात केलेल्या नितीश राणा आणि शुभमन गिल यांनी कोलकाताच्या डावाची सुरुवात चांगली केली असं वाटत होतं. मात्र चौथ्या षटकात नितीश राणा 15 धावांवर बाद झाला. अक्षर पटेलने नितीश राणाला बाद केले. त्यानंतर शुभमन गिल आणि राहुल त्रिपाठी यांनी कोलकाताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 44 धावांची महत्वपूर्ण भागिदारी केली.
मात्र मार्कस स्टॉइनिसने 10 व्या षटकात राहुल त्रिपाठीला बाद केले. राहुलने 17 चेंडूत 19 धावा केल्या. त्यानंतर कोलकाताला सलग दोन धक्के बसले. कर्णधार ईऑन मॉर्गन आणि सुनील नायारण शून्यावर बाद झाले. ललित यादवने दोघांना माघारी धाडलं. त्यानंतर चांगली खेळी करत असलेल्या शुभमन गिलही बाद झाला. शुभमनने 38 चेंडूत 43 धावा केल्या. या खेळीत त्याने 3 चौकार आणि एक षटकार लगावला. कोलकाताची अवस्था 5 बाद 82 असताना आंद्रे रसेल मैदानात उतरला.
आंद्रे रसेलने तुफानी फटकेबाजी करत 27 चेंडूत 45 धावा कुटल्या. या खेळीत त्याने 4 षटकार आणि 2 चौकार लगावले. दिनेश कार्तिक 10 चेंडूत 14 धावा आणि पॅट कमिन्सने 11 धावा करत रसेलचा चांगली साथ दिली. अशारीतीने कोलकाताना 150 धावाचा टप्पा पार करत दिल्ली समोर 155 धावांचं लक्ष्य ठेवलं. दिल्लीकडून अक्षर पटेल, ललित यादवने प्रत्येकी दोन तर आवेश खान आणि मार्क स्टॉयनिसने प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.