जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत पी. व्ही. सिंधूचा शानदार विजय, जपानच्या नोझोमी ओकुहाराविरुद्ध 21-07 आणि 21-07 ने विजय
सिंधूने अंतिम फेरीत जपानच्या नोझोमी ओकुहाराचा दोन सरळ सेट्समध्ये धुव्वा उडवला. तिनं हा सामना 21-7, 21-7 असा जिंकून ऐतिहासिक यशाला गवसणी घातली.
स्वित्झर्लंड: ऑलिम्पिक रौप्यविजेत्या पी व्ही सिंधूनं अखेर जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे. जागतिक बॅडमिंटनचं सुवर्णपदक मिळवणारी सिंधू ही भारताची पहिली खेळाडू ठरली आहे. सिंधूने अंतिम फेरीत जपानच्या नोझोमी ओकुहाराचा दोन सरळ सेट्समध्ये धुव्वा उडवला. तिनं हा सामना 21-7, 21-7 असा जिंकून ऐतिहासिक यशाला गवसणी घातली. याआधी 2017 आणि 2018 साली सिंधूनं या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. पण त्या दोन्ही वेळा तिला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं होतं. पण ते अपयश धुवून काढत सिंधूनं आपल्या शिरपेचात मानाचा नवा तुरा खोवला.
पी. व्ही. सिंधूची बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन टुर्नामेंटमध्ये फायनल्समध्ये पोहोचण्याची ही तिसरी वेळ होती. याआधी 2017 आणि 2018 साली सिंधूनं जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. बॅडमिंटनच्या महिला क्रमवारीत वर्ल्ड नंबर 5 असणाऱ्या सिंधूने आज जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत गोल्ड मेडल पटकावलं. सिंगल्स खेळाडूंपैकी फार कमी खेळाडू दोन सेट्समध्ये गेम संपवतात, आजपर्यंत फक्त चार सिंगल्स प्लेअर्सने सरळ दोन सेट्समध्ये विजय प्राप्त केलाय, सिंधू आता या खेळाडूंपैकी एक आहे.
दोन वर्षांपूर्वी नोझोमी ओकुहारा आणि पी. व्ही. सिंधू एकमेकींविरोधात खेळल्या होत्या, हा सामना तब्बल 110 मिनिटे सुरु होती आणि 110 मिनिटांची हा सामना इतिहासातील सर्वाधिक वेळ चाललेला सामना होता. आज झालेली बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनची मॅच केवळ 32 मिनिटांत संपली. पहिला सेट सिंधूने 21-07 आणि दुसराही सेट 21-07 च्या फरकाने जिंकला. 2019 सालातील हे पी. व्ही. सिंधूचं पहिलं गोल्ड मेडल आहे.