Paris Olympics 2024: 'पॅरिसच्या रस्त्यांवरुन रक्ताच्या नद्या वाहतील...'; ऑलिम्पिकआधी हमासने व्हिडीओद्वारे दिली धमकी
Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या दरम्यान हल्ला करण्याची धमकी हमासने दिली आहे.
Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिक (Paris Olympics 2024) खेळ 26 जुलैपासून सुरू होणार असून 11 ऑगस्ट रोजी संपणार आहेत. या खेळांमध्ये 196 देशांतील 10 हजारांहून अधिक खेळाडू सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या स्पर्धेची तयारी सध्या जोरदार सुरु आहे. याचदरम्यान पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या दरम्यान हल्ला करण्याची धमकी हमास (Hamas) दिली आहे.
हमासने धमकी देण्याचा व्हिडीओ जारी केला आहे. ऑलिम्पिकदरम्यान पॅरिसच्या रस्त्यांवरुन रक्ताच्या नद्या वाहतील, अशी धमकी हमासकडून देण्यात आली आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने तोंडावर मास्क घातले असून त्याच्या कपड्यावर पॅलेस्टाइनचा झेंडा असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.
Today Hamas released a video threatening that “rivers of blood will flow through the streets of Paris” at the Olympic Games #Paris2024 #HamasAreTerrorists #Olympics #ParisOlympics pic.twitter.com/s5QnziTLG7
— Amitabh Chaudhary (@MithilaWaala) July 23, 2024
हमास म्हणजे काय?
तर हमास ही पॅलेस्टिनी अतिरेकी संघटना आहे, जी गाझा पट्टीवर पूर्णपणे राज्य करते. ते तेथे राहणाऱ्या लोकांमध्ये लपून त्यांची संपूर्ण फौज तयार करतात. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रं असतात, ज्याद्वारे ते प्रत्येक वेळी इस्रायलला लक्ष्य करतात. अशा हल्ल्यांसाठी इराण (Iran) हमासला उघडपणे मदत करतो, असं मानलं जातं. तर ब्राझील, चीन, इजिप्त, इराण, नॉर्वे, कतार आणि रशियासह अनेक देश हमासला दहशतवादी संघटना मानत नाहीत.
हमास सर्वात प्रभावशाली संघटना
हमास आणि इस्रायल यांच्यातील लढाईचा मोठा इतिहास आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हमास 1980 च्या दशकात एक संघटना बनली आणि सध्या पॅलेस्टाईनमधील सर्वात शक्तिशाली संघटना आहे. पॅलेस्टाईनच्या इस्लामिक संघटनांमध्ये ही सर्वात मोठी आणि सर्वात प्रभावशाली आहे. हमास, म्हणजेच इस्लामिक रेझिस्टन्स मूव्हमेंटची स्थापना 1980 मध्ये शेख अहमद यासिन यांनी केली होती. इस्त्रायलविरुद्ध बंड करण्यासाठी हमासची स्थापना झाली. हमासने 1988 मध्ये पॅलेस्टाईनला मुक्त करण्यासाठी स्थापन केल्याची घोषणा केली होती.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 4 नवीन खेळांचा समावेश-
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये चार नवीन खेळांचा समावेश करण्यात आला आहे. यावेळी ब्रेकडान्सिंग ऑलिम्पिकमध्ये पदार्पण करणार आहे. यावेळी स्केटबोर्डिंग, सर्फिंग आणि स्पोर्ट्स क्लाइंबिंगचाही ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्यात आला आहे. मात्र, यावेळी काही खेळ ऑलिम्पिकचा भाग नसतील. कराटे, बेसबॉल आणि सॉफ्टबॉल हे खेळ टोकियो ऑलिम्पिकचा भाग होते, पण यावेळी ते काढून टाकण्यात आले आहेत. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या चार नवीन खेळांमध्ये एकही भारतीय खेळाडू पात्र ठरलेला नाही.