(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Neeraj Chopra: नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; प्रतिष्ठेची डायमंड लीग स्पर्धा जिंकली
भालाफेकपटू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) डायमंड लीग फायनल (Diamond League Final) जिंकून कारकिर्दीत आणखी एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
Neeraj Chopra Diamond League Final : भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) डायमंड लीग फायनल (Diamond League Final) जिंकून कारकिर्दीत आणखी एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. स्वित्झर्लंडच्या झुरिचमध्ये अॅथलेटिक्समधल्या प्रतिष्ठेच्या डायमंड लीग स्पर्धेची मेगा फायनल पार पडली या स्पर्धेत भारताचा स्टार अॅथलीट नीरज चोप्राने डायमंड लीगच्या भालाफेक प्रकारात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. हा किताब पटकावणारा नीरज चोप्रा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे. नीरज चोप्राने झुरिच येथे झालेल्या फायनलमध्ये 88.44 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह विजेतेपद पटकावले. नीरज 2017 आणि 2018 मध्येही फायनलसाठी पात्र ठरला होता. मात्र, त्यानंतर त्यांना अनुक्रमे सातव्या आणि चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.
Golds,Silvers done, he gifts a 24-carat Diamond 💎 this time to the nation 🇮🇳🤩
— Athletics Federation of India (@afiindia) September 8, 2022
Ladies & Gentlemen, salute the great #NeerajChopra for winning #DiamondLeague finals at #ZurichDL with 88.44m throw.
FIRST INDIAN🇮🇳 AGAIN🫵🏻#indianathletics 🔝
X-*88.44*💎-86.11-87.00-6T😀 pic.twitter.com/k96w2H3An3
गेल्या महिन्यात लुसाने डायमंड लीग स्पर्धेत त्याने 89.08 मीटर अंतरावर भाला फेकत प्रथम स्थान पटकावलं होतं आणि झुरिचमधील प्रतिष्ठेच्या डायमंड लीग स्पर्धेत धडक मारली होती. या डायमंड लीगच्या फायनलमध्ये नीरजची सुरुवात चांगली झाली नाही. त्याचा पहिला थ्रो फाऊल होता. दुसऱ्या प्रयत्नात त्याने 88.44 मीटर अंतरावर भाला फेकला. तिसऱ्या प्रयत्नात 88.00 मीटर, चौथ्या प्रयत्नात 86.11 मीटर तर पाचव्या प्रयत्नात 87.00 मीटर आणि सहाव्या प्रयत्नात 83.60 मीटर भाला फेकला. या अंतिम फेरीत झेक प्रजासत्ताकचा जेकोब 86.94 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह दुसरा, तर जर्मनीचा ज्युलियन वेबर 83.73 मीटर फेकसह तिसऱ्या क्रमांकावर राहिला.
नीरजने 2021 मध्ये ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण, 2018 मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण, 2018 मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण, 2022 मध्ये जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक जिंकून भारताचा गौरव वाढवला आहे.
ऐतिहासिक रौप्य पदक पटकावताना झाली होती दुखापत
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (CWG 2022) अंतिम फेरीत ऐतिहासिक रौप्य पदक पटकावताना नीरजला दुखापत झाली होती. यामुळं नुकत्याच झालेल्या बर्मिंगहम कॉमनवेल्थ स्पर्धेला देखील तो खेळू शकला नव्हता. नीरज चोप्राला वैद्यकीय पथकाने चार आठवड्यांच्या विश्रांतीचा सल्ला दिला होता. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रानं वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत रौप्यपदक जिंकत यूएसमध्ये भारताचा तिरंगा फडकावला. या पदकासह नीरज चोप्रानं तब्बल वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमधील तब्बल 19 वर्षांची प्रतिक्षा संपवली. मात्र, या स्पर्धेदरम्यान मांडीला दुखापत झाल्यानं त्याला एक महिना मैदानापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यामुळे तो बर्मिंगहम येथे 28 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान पार पडलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत तो खेळू शकला नाही.