विदेशी चाहतीनं तिरंग्यावर मागितला 'ऑटोग्राफ'; त्यानंतर गोल्डन बॉयनं जे काही केलं, ते पाहून तुम्हीही म्हणाल, "नीरज आम्हाला तुझा अभिमान आहे!"
Neeraj Chopra: नीरजनं निशाणा साधला अन् भालाफेकत सुवर्णपदकावर नाव कोरलं. पण स्पर्धा जिंकल्यानंतर भारताच्या गोल्डन बॉयसोबत घडलेला एक प्रसंग सध्या चर्चेत आहे.
World Javelin Championships : भारताचा 'गोल्डन बॉय' नीरज चोप्रा (Neeraj Chopra) यानं पुन्हा एकदा आपल्या धडाकेबाज कामगिरीनं सर्वांची मनं जिंकली आहेत. जागतिक भालाफेक स्पर्धेत (World Javelin Championships Updates) नीरजनं 88.17 मीटरपर्यंत भालाफेकत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. जागतिक भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारा पहिला भारतीय भालाफेटपटू ठरला आहे. स्पर्धेत विजय मिळवत नीरजनं सर्वांचीच मनं जिंकलीच, पण त्यानंतरही नीरजनं केलेल्या एका कृत्यामुळे त्यानं प्रत्येक भारतीयाची मान अभिमानानं उंचावली आहे.
नीरजनं निशाणा साधला अन् भालाफेकत सुवर्णपदकावर नाव कोरलं. पण स्पर्धा जिंकल्यानंतर भारताच्या गोल्डन बॉयसोबत घडलेला एक प्रसंग सध्या चर्चेत आहे. हंगेरीमधील स्पर्धेत नीरजनं सुवर्णपदक जिंकल्यानंतर त्याची एक विदेशी चाहती हातात तिरंगा घेऊन त्याच्याकडे आली आणि राष्ट्रध्वजावरच ऑटोग्राफ मागू लागली. पण क्षणाचाही विलंब न लावता नीरजनं तिला स्पष्ट नकार दिला. पण नीरजनं चाहतीचं मन मात्र मोडलं नाही. त्यानं तिनं घातलेल्या टीशर्टच्या बाहीवर ऑटोग्राफ दिली. नीरजच्या या कृत्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगल्या आहेत. तर सर्वच स्तरातून नीरजवर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. एवढंच नाहीतर नीरज आम्हाला तुझा अभिमान आहे, अशा प्रतिक्रियाही चाहत्यांकडून दिल्या जात आहेत.
हंगेरीत सुरू असलेल्या जागतिक भालाफेक स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या एक पत्रकारानं नीरजनं केलेल्या या अभिमानास्पद कृत्याबाबत ट्वीट करत माहिती दिली. पत्रकारानं ट्वीटमध्ये म्हटलंय की, "एक अतिशय सुंदर हंगेरियन महिलेला (जिला खूप चांगलं हिंदी बोलता येत होतं) नीरज चोप्राचा ऑटोग्राफ हवा होता. नीरजनंही तिला होकार दिला, पण नंतर त्याच्या लक्षात आलं की, महिलेला भारताच्या राष्ट्रध्वजावर ऑटोग्राफ हवा आहे. नीरजनं क्षणाचाही विलंब न लावता, "मी तिथे ऑटोग्राफ करू शकत नाही" असं स्पष्ट सांगितलं. शेवटी, नीरजनं तिच्या शर्टच्या बाहीवर ऑटोग्राफ दिला. ती हंगेरियन महिलाही खूप आनंदी होती."
नीरजनं सुवर्ण, तर पाकिस्तानच्या नदीम अर्शदचं रौप्य कामगिरी
हंगेरीच्या बुडापेस्ट शहरात सुरू असलेल्या (अॅथेलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिप) World Athletics Championship 2023 च्या शेवटच्या दिवशी आज भारताला भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकले आहे. नीरजने 88.17 मीटर लांब भालाफेक करून ही सुवर्ण कामगिरी केली. याच स्पर्धेत पाकिस्तानी खेळाडू नदीम अर्शद दुसऱ्या क्रमांकावर राहिला आणि त्याला रौप्यपदक जिंकण्यात समाधान मानावे लागले.
2020 साली ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेक प्रकारात सुवर्णपदक जिंकलेल्या नीरज चोप्राने आज येथे जागतिक स्पर्धेत पुन्हा सुवर्ण कामगिरी करत क्रीडा क्षेत्रात जागतिक स्तरावर भारताचा झेंडा आणखी उंच केला. यापूर्वी नीरज चोप्राने World Athletics Championship स्पर्धेत रौप्य पदक पटकावले होते.