नवी मुंबई महापालिका आयुक्तांनी पूर्ण केली दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड मॅरेथॉन, 11 तासांत पूर्ण केलं 86.6 किलोमीटर अंतर
South Africa Comrade Marathon : नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड मॅरेथॉन पूर्ण करत सातासमुद्रापार तिरंगा फडकवला आहे.
नवी मुंबई : दक्षिण आफ्रिकेतील (South Africa) कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये (Comrade Marathon) नवी मुंबई महापालिका (Navi Mumbai Palika) आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये त्यांनी 86.6 किलोमीटरचे अंतर 11 तासांत पूर्ण केलं आहे. वेळेत स्पर्धा पूर्ण करणारे ते पहिले सनदी अधिकारी ठरले आहेत. दक्षिण अफ्रिकेतील 86.6 किलोमीटर अंतराच्या जागतिक स्तरावरील मानाच्या कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी सहभागी होत निर्धारित वेळेच्या आधीच 11 तास 10 मिनिटे 56 सेकंदात अंतर पूर्ण करून नवी मुंबई शहराचा नावलौकिक जगभरात उंचावला आहे.
नवी मुंबई महापालिका आयुक्तांनी सातासमुद्रापार फडकवला तिरंगा
कॉम्रेड मॅरेथॉन ही जगातील एक नामांकित स्पर्धा असून तब्बल 86.6 किलोमीटरची ही स्पर्धा पूर्ण करताना खेळाडूंचा कस लागतो. स्पर्धेत सहभागी होऊन वेळेत स्पर्धा पूर्ण करणे हे प्रत्येक मॅरेथॉन धावणाऱ्या खेळाडूचे स्वप्न असते. त्याकरिता खेळाडू कठोर मेहनत घेत असतात. यावर्षी 9 जून रोजी ही 97 वी मॅरेथॉन डर्बन येथून सुरू होऊन पीटरमार्टिझबर्ग शहरात संपन्न झाली.
डॉ. कैलास शिंदेंनी पूर्ण केली कॉम्रेड मॅरेथॉन
यावर्षीची मॅरेथॉन अपरन अर्थात चढणीची होती. एक वर्ष डाऊन रन आणि एक वर्ष अपरन अशी कॉम्रेड मॅरेथॉन असते. यावर्षी 5923 फूट उंचीचे 86.6 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी 74 हून अधिक देशातील 22 हजारपेक्षा जास्त स्पर्धक सहभागी झाले होते. यामध्ये 366 भारतीय स्पर्धकांचा समावेश होता. समुद्रसपाटीपासून 1800 मीटर उंचीवर असलेल्या हे अंतर पार करताना 20 ते 25 टेकड्या चढाव्या लागतात. ही स्पर्धा 12 तासांच्या आत पूर्ण करावी लागते. डॉ. कैलास शिंदे यांनी 11 तास 10 मिनिटे 56 सेकंदात हे अंतर पार करून आपली शारीरिक क्षमता सिध्द केलेली आहे.
11 तासांत पूर्ण केलं 86.6 किलोमीटर अंतर
त्यासाठी मागील सहा महिन्यांपासून डॉ. कैलास शिंदे कसून सराव करत होते. प्रामुख्याने सुट्टीच्या दिवशी त्यांनी रात्री आणि पहाटे सराव करून मॅरेथॉनच्या अंतराचे आणि वेळेचे व्यवस्थित नियोजन केले. आफ्रिकेसारख्या देशात धावायचे असल्याने तेथील भौगोलिक परिस्थितीचाही विचार करून त्यांनी तशा प्रकारे सरावावर भर दिला. महत्त्वाचे म्हणजे आपल्या सरावाचा कोणताही परिणाम त्यांनी दैनंदिन कामकाजावर होऊ दिला नाही. नवी मुंबई महानगरपालिकेचे प्रशासकीय कामकाज त्यांनी आयुक्त म्हणून संपूर्ण क्षमतेने पाहिलेच, शिवाय लोकसभा निवडणुकीची निरीक्षक म्हणून बिहारमध्ये जबाबदारी पार पाडत असतानासुद्धा धावण्याच्या सरावात खंड पडू दिला नाही. जगातील अत्यंत आव्हानात्मक आणि खडतर समजल्या जाणाऱ्या या जागतिक मॅरेथॉनमध्ये सहभागी होणारे ते एकमेव सनदी अधिकारी आहेत.
सलग दुसऱ्या वर्षी त्यांनी हे यश मिळवले असून गतवर्षीपेक्षा कमी वेळेत स्पर्धा पूर्ण करीत त्यांनी आपली कामगिरी आणखी उंचावली आहे. आधी सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक आणि त्यानंतर नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक म्हणून अत्यंत महत्त्वाची प्रशासकीय जबाबदारी आणि अत्यंत व्यस्त दिनक्रमातही त्यांनी आपल्यातील खेळाडू जिवंत ठेवला आहे. ध्येय पार करण्याची जिद्द, अथक परिश्रम, चिकाटी आणि योग्य नियोजन याच्या बळावर त्यांनी हे यश मिळविेले असून या जागतिक पातळीवरील कॉम्रेड मॅरेथॉनमधील यशाबद्दल नवी मुंबई महानगरपालिकेचे तथा प्रशासक डॉ. कैलास शिंदे यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन आणि प्रशंसा करण्यात येत आहे.