एक्स्प्लोर
कोहलीची बंदूकवाली फॅन, लंडनमधील लेडी ऑफिसर विराटवर फिदा!

लंडन: एका खांद्यावर अत्याधुनिक रायफल, तर दुसऱ्या खांद्यावर टीम इंडियाच्या सुरक्षेची जबाबदारी. पण त्याच वेळी हृदयात मात्र विराट कोहलीच्या बहारदार फलंदाजीविषयी जपलेलं प्रेम. अशी विराटची चाहती पोलीस ऑफिसर सध्या इंग्लंडमध्ये आहे. भारताचा कर्णधार विराट कोहलीचा क्रिकेटच्या दुनियेत आज बोलबाला आहे. लंडनही त्याला अपवाद नाही. टीम इंडियाच्या सुरक्षेसाठी तैनात ब्रिटिश पोलिसांमधली एक महिला ऑफिसर भारतीय कर्णधाराच्या फलंदाजाची विराट चाहती आहे. मॅन्चेस्टरमधल्या म्युझिक कॉन्सर्टमध्ये 22 मे रोजी झालेल्या आत्मघातकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियासाठी लंडनमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. इंटेलिजन्समधल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ब्रिटनमध्ये अजूनही आत्मघातकी हल्ल्यांचा प्रयत्न होऊ शकतो. त्यामुळं चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यांसाठीची, तसंच सहभागी संघांमधल्या खेळाडूंची सुरक्षा हे मोठं आव्हान ठरलं आहे. विराट कोहली आणि त्याची टीम इंडिया रविवारी सकाळी केनिंग्टन ओव्हलवरच्या सराव सामन्यासाठी निघाली, त्या वेळी त्यांच्या हॉटेलच्या बाहेर शस्त्रसज्ज पोलिस तैनात करण्यात आले होते. त्यात एका महिला पोलीस ऑफिसरचाही समावेश होता. विराटनं बसमध्ये चढायच्या आधी त्या महिला ऑफिसरशी आवर्जून संवाद साधला. निम्मी टीम इंडिया हॉटेलमधून बाहेर पडल्यावर विराट आला आणि त्या महिला ऑफिसरशी तिच्यावरच्या जबाबदारीविषयी आपुलकीनं बातचीत केली. मागून आलेले टीम इंडियाचे शिलेदार आणि सपोर्ट स्टाफ तिथंच उभे राहून दोघांमधला संवाद ऐकत होते. विराट त्या महिला ऑफिसरशी संवाद साधून पुढे निघाला, त्या वेळी तिच्या चेहऱ्यावर छान स्मित उमटलं होतं. कारण ती विराटची फॅन आहे. "विराट खूपच उत्तम फलंदाज आहे. त्याला भेटून मजा आली", असं ही फॅन म्हणाली. विराट कोहली आज जगभरात कुठंही जाऊ द्या. त्याला चाहत्यांकडून प्रचंड प्रेम मिळतं. याचं कारण विराटची बहारदार फलंदाजी. आयपीएल मोसम त्याच्यासाठी निराशाजनक ठरला. पण रविवारी न्यूझीलंडविरुद्धच्या सराव सामन्यात विराटची बॅट पुन्हा बोलली. आता टीम इंडियाला चॅम्पियन्स ट्रॉफीत आपल्या कर्णधाराकडून त्याच कामगिरीची पुन: पुन्हा अपेक्षा आहे. जगविंदर पटियाल, एबीपी माझा, लंडन
आणखी वाचा























