Maharashtra Kesari 2025 : ...तर पंचाला मारहाण झालीच नसती; शिवराज राक्षेच्या आईनं स्पष्टच सांगितलं, महाराष्ट्र केसरीवर रोखठोक मत मांडलं!
Shivraj Rakshe Mother First Reaction : महाराष्ट्र केसरी फायनलचा दिवस गाजला तो वादामुळे.

Maharashtra Kesari 2025 Shivraj Rakshe : पृथ्वीराज मोहोळ (Pruthviraj Mohol) की महेंद्र गायकवाड (Mahendra Gaikwad) यंदाचा महाराष्ट्र केसरी कोण होणार? याकडे आख्या महाराष्ट्रचे लक्ष लागले होते. पण महाराष्ट्र केसरी फायनलचा दिवस गाजला तो वादामुळे. मॅटवरची फायनल शिवराज राक्षे (Shivraj Rakshe) आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यात झाली, ज्यामध्ये पंचाच्या निर्णयामुळे वाद पेटला. ही लढत पृथ्वीराज मोहोळने जिंकली. पण शिवराज राक्षेला पराभव मान्य झाला नव्हता. त्याने थेट पंचांच्या निर्णयाचा विरोध केला आणि रागात पंचांची कॉलर खेचली आणि लाथही मारली. मात्र, माझी पाठ टेकली नव्हती, असे स्पष्ट करत शिवराज राक्षेने (Shivraj Rakshe) आरोप फेटाळले आहेत.
दरम्यान, डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेवर तीन वर्षे कुस्ती खेळण्याची बंदी घालण्यात आलीये. अहिल्यानगर येथील स्पर्धेवेळी पंचांशी गैरवर्तवणूक केल्याचा ठपका राक्षेवर ठेवलाय. यानंतर शिवराजच्या कुटुंबियांनी संताप व्यक्त केलाय. शिवराजचे निलंबन केले तसे पंचांना ही शिक्षा करा, अशी मागणी शिवराजच्या आईने केलीये. तर महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत मॅच फिक्सिंग होते, असा गंभीर आरोप शिवराजच्या वहिनींनी केलाय.
...तर पंचाला मारहाण झालीच नसती, शिवराज राक्षेच्या आईनं स्पष्टच सांगितलं!
शिवराज राक्षेची आई म्हणाली, तो महाराष्ट्र केसरी व्हावा यासाठी मी सकाळपासुन देवासमोर बसुन प्रार्थना करत होते, मात्र पंचाच्या चुकीच्या निर्णयामुळे शिवराज हरला, त्याच्यावर पंचाने अन्याय केलाय. तो फक्त रिप्लाय दाखवा म्हणत होता, तुम्ही रिप्लाय दाखवला असता तर असे काहीच घडले नसते. आज तो पण काय हलका आहे काय? डबल महाराष्ट्र केसरी आहे.
शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्या सामन्याचा थरार
अहिल्यानगरची दिवंगत बलभीम अण्णा जगताप क्रीडानगरी गेले चार दिवस माती आणि गादी विभागातला वेगवेगळ्या गटातल्या कुस्तीचा थरार महाराष्ट्राच्या कुस्तीप्रेमींना अनुभवला, पण शेवटच्या दिवशी जे घडलं ते धक्कादायक होतंय. मॅट विभागातली अंतिम फेरी सुरु होती. ज्यामध्ये नांदेडचा डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे विरुद्ध पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ यांच्यात लढत रंगली होती, पण पृथ्वीराज मोहोळनं अवघ्या काही मिनिटात शिवराजला चितपट केलं. पण पंचांचा हा निर्णय शिवराजला रुचला नाही. त्यानं थेट या निर्णयाविरोधात आव्हान दिलं. पण पंचांनी आपला निर्णय बदलला नाही. शिवराजनं पंचांना या याचा जाब विचारला, मात्र रागाच्या भरात त्यानं थेट पंचांची कॉलर पकडली, आणि मग लाथ मारली.
शिवराज राक्षेनं याआधी दोन वेळा महाराष्ट्र केसरीची गदा पटकावलीये. आपण तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होऊ नये यासाठी जाणूनबुजून आपल्याविरोधात निर्णय दिल्याचा आरोप राक्षेने केला. यावेळी शिवराज राक्षेचे वस्ताद काका पवार यांनीही एबीपी माझाशी बोलताना निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त केली.
























