(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कृणाल पंड्याने दुबईवरुन आणलेली महागडी घड्याळं जप्त, किती कर भरावा लागणार?
आयपीएल संपल्यानंतर युएईवरुन भारतात परतलेल्या मुंबई इंडियन्सचा खेळाडू कृणाल पंड्याला विमानतळावर रोखण्यात आलं. त्याच्याकडून महागडी घड्याळं जप्त करण्यात आली. ही घड्याळं परत मिळवण्यासाठी कृणालला कर म्हणून भलीमोठी रक्कम भरावी लागण्याची शक्यता आहे.
मुंबई : इंडियन प्रीमियर लीगचा तेरावा मोसम संपल्यानंतर मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू कृणाल पंड्याला अडचणींचा सामना करावा लागला. यूएईवरुन परत येताना मर्यादेपेक्षा जास्त सोनं आणि महागडी घड्याळं बाळगल्याप्रकरणी त्याला मुंबई विमानतळावर थांबवण्यात आलं होतं. यानंतर कृणालने आपली चूक स्वीकारली शिवाय अशी चूक पुन्हा करणार नाही, असं आश्वासन दिलं. तीन तासांच्या चौकशीनंतर डीआरआने कृणालकडली घड्याळं जप्त करुन डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्सने त्याला जाण्याची परवानगी दिली.
संयुक्त अरब अमिरातमध्ये झालेल्या आयपीएलचा तेरावा मोसम संपल्यानंतर काही खेळाडू भारतात परतले. यात कृणा पंड्याचा समावेश होता. यावेळी कृणाल पंड्याने दुबईमध्ये खरेदी केलेली सोन्याची चैन ही भारतीय कायद्याअंतर्गत परवानगीपेक्षा जास्त वजनाची असल्याचं समोर आलं. शिवाय त्याच्याकडे काही महागडी घड्याळही होती. त्यामुळे त्याला विमानतळावरच रोखण्यात आलं. त्याला याबाबत माहिती देण्यात आली. यानंतर आपल्याला नियमांची माहिती नव्हती असं सांगत पंड्याने आपली चूक स्वीकारली.
क्रिकेटपटू कृणाल पांड्याला डीआरआयने मुंबई विमानतळावर रोखलं; चौकशी सुरु
पंड्याला कस्टम ड्युटी आणि दंड म्हणून किती भरावी लागणार? पंड्या आणि त्याच्या पत्नीकडे सोन्याच्या चैनसह Audemars Piguet डायमंडची दोन आणि Rolex Modelsची दोन अशी एकूण चार महागडी घड्याळं सापडली आणि त्याची माहिती त्याने महसूल विभागाला दिली नव्हती. या दोन घड्याळांची किंमतच जवळपास एक कोटींच्या घरात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ही घड्याळं मुंबई विमानतळावरील कस्टम युनिटने ताब्यात घेतली. घड्याळं परत घेण्यासाठी त्याला कस्टम ड्युटी आणि दंडही भरावा लागेल. इम्पोर्टेड लक्झरी घड्याळांवर 38.5 टक्के कर लागू शकतो. त्यामुळे हा टॅक्स जवळपास 38 लाख एवढा आहे. यात दंडाची रक्कम वेगळी आहे.
परदेशातून सोनं, महागड्या वस्तू आणण्यासाठी नियम काय? एक वर्षापेक्षा जास्त काळ परदेसात राहणाऱ्या व्यक्तीला 50 हजार रुपये किंमतीचं सोनं भारतात ड्युटी फ्री आणता येतं. तर महिलांना एक लाख रुपये किमतीचं सोन आणण्याची परवानगी आहे. ही अट केवळ सोन्याच्या दागिन्यांसाठीच लागू आहे. सोन्याची नाणी आणि बिस्किटांवर कर द्यावा लागतो. जर तुम्ही परदेशात सोनं खरेदी केलं असे तर त्यासोबत त्याची रिसीट असावी. ही पावती तुम्हाला कस्टम आणि इतर यंत्रणांद्वारे केल्या जाणाऱ्या चौकशीत मदत करतील आणि यातून सोन्याच्या किंमतही सहजरित्या समजू शकते.
तेराव्या मोसमात कृणाल पंड्याची चमक फिकी कृणाल पंड्याची आयपीएलच्या तेराव्या मोसमातील कामगिरी फारशी चांगली नव्हती. या मोसमात त्याला फलंदाजीसाठी फारच कमी वेळा संधी मिळाली. त्याने 16 सामन्यांमध्ये 18.16 च्या सरासरीने 109 धावा केल्या. तर गोलंदाजीमध्येही त्याने फारशी कमाल केली नाही. 16 सामन्यात त्याने फक्त 6 विकेट्सच घेतल्या.
Krunal Pandya Stopped at Mumbai Airport | दुबईवरून येताना सोनं आणल्याबाबत कृणाल पंड्या ताब्यात